नागपूर: दिवाळीच्या काळात घरफोडीच्या घटनांमध्ये अचानक वाढ होते. यंदा मात्र पाच वर्षांच्या तुलनेत घरफोडीचा आकडा काही प्रमाणात कमी झाल्याचा दावा नागपूर पोलिसांनी केला आहे.(Burglaries In Nagpur). या वर्षी दिवाळीच्या महिन्यात 70 घरफोड्यांची नोंद झाली आहे. (70 burglaries in a month). महत्त्वाचे म्हणजे या महिन्यात झालेल्या एकूण घरफोडी घटेनच्या तुलनेत चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याची टक्केवारी ही सरासरी 75 टक्यांपेक्षा जास्त आहे.
दोन मोठ्या घरफोडीत दीड कोटींचा ऐवज लंपास: या 70 घरफोडीच्या घटनांमध्ये दोन मोठ्या घरफोड्यांचा समावेश आहे. चोरीच्या पहिल्या घटनेत चोरट्यांनी 63 लाख रुपये आणि दुसऱ्या घटनेत 73 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली चौक परिसरात असलेल्या हनी-आर्केड इमारतीतील एका व्यापाऱ्यांच्या घरी तब्बल ६१ लाख रुपयांची घरफोडी झाल्याची घटना घडली होती. व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या नोकराला चोरी प्रकरणात अटक केली आहे. दुसरी घटना नागपूर शहरातील शांतीनगर परिसरात घडली होती. एका मोठ्या व्यावसायिकाच्या घरून चोरट्यांनी 73 लाखांच्या ऐवज लंपास केला होता. यामध्ये दीड किलो सोनं आणि 13 लाखांची रोकड होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासात चोरीच्या घटनेचा पर्दाफाश केला आहे. व्यावसायिकाच्या मुलानेच घरात चोरी केल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीसह दोघांना अटक केली होती.
सोशल मिडियाचा चोरट्यांना फायदा: अनेक जण बाहेर फिरायला जाताना त्याची माहिती सोशल मीडियावर टाकतात. सोशल मीडियावर नजर ठेवून असलेल्या चोरांना त्यामुळे घर रिकामे असल्याची आयती टीप मिळते. त्यामुळे दिवाळीच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होते अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली आहे.
पेट्रोलिंगमध्ये वाढ: नागपूर शहर चोरींच्या घटनांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात बदनाम आहे. त्यामुळे यावेळी नागपूर पोलिसांनी दिवाळीच्या काळात पेट्रोलिंगमध्ये वाढ केली होती. या पेट्रोलिंगमध्ये यावर्षी चोरीच्या घटनांमध्ये घट नोंदवण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली आहे.