नागपूर- जपानी मेंदूज्वराने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून आले आहे. या आजारामुळे सहा जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत ३० रुग्ण आढळून आले आहेत तर नागपूर विभागातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात देखील जपानी मेंदूज्वराचे रुग्ण आढळून आले असून या आजाराचे सगळ्यात जास्त रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात आढळून आले आहेत. मात्र, शहरातील आरोग्य विभागाच्या मेडिकल ऑडिटमध्ये जोपर्यंत रुग्णाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होत नाही, तो पर्यन्त सदरील आजारामुळे त्याची मृत्यू झाल्याचे कळत नाही, अशी अवस्था आहे.
जपानी मेंदूज्वर हा जपानी अॅक्यूट एन्सेफलायटिस या व्हायरसमुळे होतो. हा वायरस प्रामुख्याने पाळीव डुक्कर आणि जंगली पक्षांमध्ये आढळतो. या व्हायरसचे संक्रमण धान शेतात आढळणाऱ्या क्युलेक्स ट्रायटेनियरहिंचस समूहाच्या डासांमध्ये होतो. या डासांमुळे मानवी शरिरात अॅक्यूट एन्सेफलायटिस वायरस येतो. या आजारामुळे काही रुग्णांमध्ये हुडहुडी भरून ताप, डोकेदुखी व अंगदुखी ही लक्षणे आढळतात. रुग्ण बेशुद्ध अवस्थेत देखील जाऊ शकतो. या रोगामुळे मज्जासंस्थेचे विकार होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर भावनिक परिणाम देखील होण्याची शक्यता असते, अशी महिती हिवताप विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी दिली आहे.
सदरील लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केला आहे. जपनीज मेंदुज्वर हा संसर्गजन्य रोग नसून तो डासांच्या संक्रमणाने तो होतो. यावर नियंत्रणात्मक उपाययोजना करने महत्वाचे असून डासोत्पत्ती स्रोत कमी करणे गरजेचे आहे. तसेच डासांच्या घनतेवर नियंत्रण ठेवून विषाणूंचा प्रसार रोखता येते, अशी माहिती डॉ. गणवीर यांनी दिली.