नागपूर - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचे झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. नागपुरातही कोरोनाचा फैलाव वाढला आहे. मागील काही दिवसात नागपुरातील कोरोना रुग्णात घट झाली होती. मात्र, आता पुन्हा रुग्णांच्या संखेत वाढ होताना दिसत आहे. बुधवारी एकाच दिवशी 61 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागपूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
नाईक तलाव परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात नागपूर प्रशासनाला बऱ्यापैकी यश मिळाले होते. मात्र, आता नागपुरात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. आज एकाच दिवशी नाईक तलाव परिसरातील 61 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दाटी-वाटीच्या घरांनी गजबजलेला नाईक तलाव परिसर आता नागपुरातील नवीन कोरोना हॉटस्पॉट म्हणून समोर आला आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच पार्टी...
नाईक तलाव परिसरातील तब्बल 180 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. या भागात पहिला पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर येथील 700 पेक्षा अधिक लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळतातच या भागातील काही अतिउत्साही लोकांनी जंगी पार्टीचे आयोजन केले. त्यातूनच कोरोनाचा उद्रेक झाल्याचं बोलले जात आहे. प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र बेजबाबदार नागरिकांच्या चुकांमुळे इतर नागपूरकारांचा जीव टांगणीला लागला आहे.