नागपूर - कोरोनाच्या वाढत्या संकटात शहरासाठी एक आनंददायी बातमी आहे. कोरोनाची लागण झालेले आणि उपचार घेत असलेले आणखी सहा रुग्ण पूर्णतः बरे झाले आहेत. त्यांना सोमवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे, आता नागपुरात कोरोनाला मात देऊन पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 30 झाली आहे.
पूर्णतः बऱ्या झालेल्यांमध्ये एक रुग्ण कामठी, एक सतरंजीपुरा आणि ४ जबलपूरचे आहेत. या सर्व रुग्णांना १२ एप्रिलला आमदार निवासातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाल्यानंतर त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारानंतर १४ व्या दिवशी म्हणजे २५ एप्रिलला आणि १५ व्या दिवशी म्हणजेच २६ एप्रिलला रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. दोन्ही दिवसांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सहाही जणांना कोरोना मुक्त घोषित करण्यात आले. या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.