नागपूर - नागपूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीची अंतिम टक्केवारी जाहीर झालेली आहे. या मतदारसंघात केवळ ५४.७४ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. २०१४ च्या तुलनेत यंदा तब्बल २.३८ टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे. त्यामुळे मतदानाची घसरलेली टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडेल याची गोळाबेरीज करण्यात राजकीय विश्लेषक व्यस्त झाले आहेत.
नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. येथून केंद्र सरकारमधील परफॉर्मिंग मंत्री म्हणून नावलौकिक मिळवलेले नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले असा सामना रंगला होता. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात मतदारांमधील उत्साह बघता यावेळी नागपूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अंतिम टक्केवारी पुढे आल्यानंतर निवडणुकीचे वेगळेच चित्र पाहायला मिळाले. यावेळी नागपूर लोकसभा मतदारसंघात केवळ ५४.७४ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली, तर २०१४ ला ५७.१२ टक्के मतदान झाले होते. याचाच अर्थ यावेळी मतदानाच्या टक्केवारीत २.३८ टक्क्यांची घट झालेली आहे.
शहरातील ६ विधानसभा क्षेत्रनिहाय झालेल्या मतदानातही घट नोंदवण्यात आलेली आहे. यामध्ये पूर्व नागपूर मतदारसंघात ५७.१२ टक्के मतदान झाले, तर पश्चिम नागपुरात ५४.०२ टक्के मतदान नोंदवण्यात आले आहे. याशिवाय उत्तर नागपुरात ५४.७४, तर दक्षिण नागपुरात १२ टक्के मतदान झाले आहे. शिवाय मध्य नागपुरात ५५.५५ टक्के आणि दक्षिण पश्चिम मतदारसंघात ५३.८२ टक्के मतदान झाले आहे.
नागपुरातील सहापैकी एकही विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीने साठचा आकडा ओलांडलेला नाही. त्यामुळे सुरुवातीला बंपर मतदानाची अपेक्षा करणाऱ्यांना धक्का बसलेला आहे.