नागपूर - जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील बेला गावामध्ये असलेल्या मानस अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. मानस अॅग्रो येथील बायोगॅस मॉल्यासिस टाकीवर वेल्डिंगचे काम सुरू असताना ब्लास्ट झाला. ज्यामध्ये पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे.
मानस अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड येथील युनिट क्रमांक 1 मध्ये ही घटना घडली आहे. या स्फोटात लीलाधर शेंडे, सचिन वाघमारे, मंगेश नौकरकर, वासुदेव लडी आणि प्रफुल मुन या पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. पाचही मृत बेला गावा शेजारी असलेल्या वडगाव गावातील रहिवासी आहेत.
हेही वाचा - अयोध्येतील राम मंदिर एक हजार वर्षे टिकेल, भूकंपातही ठरणार अभेद्य
बेला हे गाव उमरेड तालुक्यातील आहे. या ठिकणी आलेल्या मानस अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यात बायोगॅस मोलॅसिस उत्पादन टँकची डागडुजी करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. उसाच्या मळीपासून बायोगॅस तयार केला जातो. ही टँक ६० लाख लिटर क्षमतेची आहे. गेल्या अनेक महिन्यापासून टॅंकचे काम बंद आहे. दरम्यान या टॅंकच्या डागडुजीचे काम सुरू असताना बायोगॅसचा स्फोट झाला. ज्यामध्ये या पाच कामगारांचा मृत्यू झालेला आहे.
स्फोट होताच कामगारांचे मृतदेह छिन्न-विच्छिन्न झाले होते. घटनेची माहिती समाजात नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला आपल्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नागरिकांनी मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी आणि बायोगॅस मोलॅसिस टँकमध्ये स्फोट कसा झाला आणि याला जबाबदार असणाऱ्या वर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे