नागपूर - शहरात कोरोनाचा उद्रेक सुरू असल्याने सध्या ऍक्टिव्ह रुग्णांची १२ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या महिन्यात एखाद्या परिसरातील दोन ते चार लोकांना कोरोनाचा संसर्ग होत होता. मात्र आता धंतोली परिसरातील एलआयसी कॉलोनी मध्ये राहणाऱ्या तब्बल ३५ रहिवाशांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने संपूर्ण कॉलनी सील करून परिसराला कंटेनमेंट झोन घोषित केले आहे.
पून्हा कंट्रोल झोनची निर्मिती
गेल्यावर्षी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर गेल्या महिन्यांपासून शहरात एकही कंटेनमेंट झोन अस्तित्वात नव्हता. आता मात्र, एकाच वेळी नागपूर शहरातील एलआयसी कॉलनीतील ३५ रहिवासी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण कॉलनी सील करण्यात आली आहे.
पॉझिटिव्ह रुग्ण विलगीकरण केंद्रात
एलआयसी रहिवासी इमारत ही शहरातील धंतोली परिसरात आहे. या ठिकाणी सुमारे ३५ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १४ रुग्णांना व्हिएनआयटी क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच इमारतीत राहणाऱ्या लोकांच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे.