नागपूर - खेळताना पाण्याच्या टाकीत पडून 3 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना डिप्टी सिग्नल परिसरात घडली आहे. वंशिका मुकेश वर्मा असे मृत चिमुकलीचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत वंशिका तिचे वडील, आजी व पाच वर्षाच्या एका भावासोबत कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील डिप्टी सिग्नल परिसरात राहतात. वंशिकाचे वडील मजुरीचे काम करतात. तर आजी एका कंपनीत काम करते. वंशिकाची आई कुटुंबासोबत राहत नाही. शनिवारी संध्याकाळी खेळता-खेळता ती एकटीच घराच्या छतावर गेली. बाथरूममध्ये जाऊन पाण्याच्या टाकीत डोकावत असताना अचानक तोल जाऊन ती टाकीत डोक्याच्या भारावर पडली. २ तासानंतरही वंशिका न दिसल्याने वडील व आजीने तिचा शोध घेतला असता ती छतावरील पाण्याच्या टाकीत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर वंशिकाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.