नागपूर- जिल्ह्यातील कामठी कन्हान भागात ३ जनांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वेकोली कोळसा खान परीसरातील मातीच्या ढीगाऱ्या खाली दबुन ३ मजूर मृत पावले आहेत. यातील मृतकांची नावे कन्हैया हरजन, गंगा जलहारे आणि शिवकुमार मनहारे असे आहेत.
कन्हान भागात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. आज खान क्रमांक ४ मध्ये या ३ मजूरांनी माती उत्खनन करून ती ट्रकमध्ये भरली आणि विश्रांतीसाठी मातीसाठवून असलेल्या ढिगाऱयाच्या आडोशाला बसले. मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने माती ओली झाली होती. १८ ते २० फूट उंचावरील मातीच ढिगारा विश्रांती करीत असलेल्या मजूरांच्या अंगावर पडला. त्यात दबून मजुरांचा मृत्यू झाला. घटना स्थळी पोलिस दाखल झाले, असून मृत्यूदेह काढण्यात आलेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. लोकांचा रोष बघता वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी मृत्यु झालेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना 20 हजार रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली आहे. मात्र या घटनेमुळे या परिसरात अवैध माती उत्खननाचा प्रश्न पून्हा एकदा ऐरणीवर आला आहे.