नागपूर - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक गाड्यांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, सावनेर तालुक्यातील सिरोंजी पोस्ट येथे गाड्यांची तपासणी सुरू असताना एक मोटारसायकल सुसाट वेगाने पळून जाण्याचा प्रयत्नात असताना निवडणूक विभागाच्या पथकाने पाठलाग करून त्या गाडीला थांबवले. त्यावेळी त्यांनी मोटरसायकलवरील दोघांकडील २५ लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे.
ही घटना नागपूर जिल्ह्याच्या रामटेक लोकसभा मतदार क्षेत्रातील सावनेर तालुक्यातील सिरोंजी पोस्ट येथे घडली आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून नागपूर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक गाड्यांची तपासणी विविध चेक पोस्टवर केली जात आहे. त्या अनुषंगाने रात्री उशिरा गाड्यांची तपासणी केली जात असताना एक दुचाकी सुसाट वेगाने येताना निवडणूक विभागाच्या पथकाला दिसून आली. त्यानंतर त्या गाडीला थांबण्याचा इशारा करण्यात आला. मात्र, गाडीवरील व्यक्तीने दुर्लक्ष करत गाडी सुसाट वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निवडणूक विभागाच्या पथकाने सिरोंजी गावाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर त्या गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवली.
त्यावेळी गाडीवरील गणपत कोडापे यांच्या पिशवीत ५०० रुपयांच्या ५ हजार नोटा म्हणजेच २५ लाख रुपये आढळून आले. निवडणूक भरारी पथकाने रक्कम जप्त करून निवडणुक निर्णय अधिकारी यांना माहिती दिली आहे. यासंदर्भात या पैशाचा स्त्रोत कोणता? पैशाचा उपयोग कोठे केला जाणार होता? यासह अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने चौकशी सुरू केली.