नागपूर: अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून तब्बल २० लाख १९ हजार रुपये किंमतीचे संशयित भेसळयुक्त अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठया प्रमाणावर खाद्यतेल, वनस्पती, खवा, मावा, रवा, मैदा, बेसन इत्यादी अन्न पदार्थ मिठाई तसेच नमकीन बनविण्याकरीता वापर करण्यात येतो. मात्र, खाद्यपदार्थांमध्ये मोठया प्रमाणात भेसळ सुरू असल्याची माहिती समाजल्यानंतर अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून कारवाई करण्यात आली आहे.
खाद्य पदार्थ तपासणी कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाद्वारे सणासुदीच्या दिवसांत उत्पादक, पॅकर, घाऊक विक्रेते, स्वीट मार्ट यांच्या तपासणीची मोहिम राबविण्यांत येत आहे. खाद्य पदार्थ तपासणी कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांमध्ये खवा मावाचे १० नमुने, मिठाईचे ५५ नमुने, नमकिन फरसाणचे १६ नमुने, खाद्यतेलाचे ६३ नमुने, घी वनस्पतीचे ०७ नमुने व इतर अन्न पदार्थांचे रवा, मैदा, बेसन इत्यादीसह ३० नमुने विश्लेषण करीता घेण्यात आले आहेत.
१७ लाखांचे खाद्य तेल जप्त सणासुदीच्या कालावधीमध्ये नागपूर शहरासह ग्रामीण भागात खुले खाद्य तेल विक्रेते आणि खाद्यतेल पॅकिंग करिता टिनाच्या डब्यांचा पूर्णवापर करून रिपॅकर करणारे देखील सक्रिय झाले आहेत. अश्या १६ ठिकाणी धाडी टाकुन १० लाख ८८२.८५ किलो वजनाचा तेल साठा जप्त करण्यात आला आहे. ज्याची किंमत १७ लाख ९४ हजार रुपये इतकी आहे. याशिवाय दोन ठिकाणी डेसीकेटेड कोकोनट पावडरचा १३६७ किलो वजनाचा साठा सुध्दा जप्त करण्यात आलेला आहे.