नागपूर - शहरातील संतरंजीपुरा येथील मृत कोरोनाबाधित व्यक्तीचा मुलगा आणि मुलगी कोरोनामुक्त झाले आहेत. आज त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली आहे. दोघेही पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन राहणार आहेत. यामुळे आता कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १७वर पोहोचली आहे.
गेल्या ५ एप्रिलला सतरंजीपुरा येथील बडी मशीद परिसरातील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्याच्यामुळे ५६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर २३५ जणांना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. ७ एप्रिलला ३५ वर्षीय मुलगी आणि ३० वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून दोघांवरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. आता त्यांच्या दोन चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, आतापर्यंत नागपुरात १७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे नागपूरकरांचे मनोबल उंचावले आहे.
नागपुरातील कोरोनाबाबत सद्यस्थिती -
नागपुरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज शंभरी गाठली आहे. 52 वर्षीय पुरुष आणि 50 वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नागपुरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 100वर पोहोचली आहे. आज नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी एक जण सतरंजीपुरा, तर एक मोमीनपुरा येथील आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने ते कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती आहे. या दोन्ही रुग्णांना इतर रुग्णांप्रमाणेच आधीच क्वारंटाईन करण्यात आले होते.
रुग्णांची संख्या -
एकूण पॉझिटीव्ह नमुने - 100
मृत्यू - 01,
डिस्चार्ज मिळालेले रुग्ण - 17,
रुग्णालयात उपचार सुरू असलेले रुग्ण - 82