नागपूर - जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळेच्या १७२ वर्ग खोल्या धोकादायक असून त्या कोसळण्याची शक्यता असल्याचा अहवाल खुद्द जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिला आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याची बाब उघडकीस आली आहे.
नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण १५३८ शाळा आहेत. या शाळांपैकी शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील शाळांच्या १७२ वर्गखोल्या धोकादायक असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील विविध शालेय व्यवस्थापन समित्या ग्रामपंचायत आणि शाळांनी वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे निवेदन दिले आहे. मात्र, शिक्षण विभागाने पुरेसा निधी नसल्याचे कारण पुढे केले आहे. अनेक शाळांमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांना जीर्ण इमारतींमध्ये धडे दिले जात असून यामुळे मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्यशासनाने याकडे लक्ष घालण्याची गरज असून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या जिल्ह्यात शाळांची अशी अवस्था असणे ही लाजीरवाणी बाब आहे.