नागपूर - कधी काळी पाण्याच्या टंचाईने त्रस्त असलेला नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुका पाणीदार झाला आहे. मौदा येथील एनटीपीसी म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशनच्या सीएसआर निधीअंतर्गत करण्यात आलेल्या नदी, नाले खोलीकरण आणि जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमुळे तब्बल १५० गावांच्या कायाकल्प झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
शेतीकरिता मुबलक पाणी उपलब्ध -
सरकारी क्षेत्रातील विद्युत कंपनी एनटीपीसी कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मौदा तालुक्यासह आजूबाजूच्या क्षेत्रातील १५०पेक्षा अधिक गावांमध्ये भूजल संवर्धनाच्या कार्यक्रमांतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आले. यामुळे तब्बल १५० गावांमध्ये असलेल्या पाणी टंचाईची समस्या निकाली निघाली आहे. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमा अंतर्गत करण्यात आलेल्या जलसंवर्धनाच्या माध्यमातून १५० गावे पाणीदार झाली आहेत. या उपक्रमामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढणार असून शेतीकरिता मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. इतकेच नाही तर पिण्याच्या पाण्याची समस्याही सुटलेली आहे. व्यावसायिक सामाजिक जबाबदारी म्हणजेच सीएसआरच्या माध्यमातून राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेलाही हातभार लावला जातो आहे. यामुळे मौदा नदी पाणीदार झाली आहे.
एनटीपीसीने दिला 'इतका' निधी -
काही योजना या काही सामाजिक संस्था आणि राज्य सरकारच्या मदतीने आर्ट ऑफ लिविंगच्या महाराष्ट्र शाखेकडूनही सुरू करण्यात आल्या आहेत. २०१७मध्ये सुरू करण्यात आलेल्या या अभियानात नागपूर जिल्ह्यातील मौदा, हिंगणा आणि कामठी तालुक्यातील शेकडो गावांना कव्हर करण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या चार वर्षात १५०पेक्षा अधिक गावांना या कामांचा फायदा झाला आहे. याकरिता एनटीपीसी मौदाकडून ७८ लाखांचा निधी खर्च केला आहे. याशिवाय १ हजार एकर क्षेत्र असलेल्या पाच तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एनटीपीसी मौदाकडून एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
हेही वाचा - शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण, शेतकरी संघटनांनी पाळला काळा दिवस
पाणी आडवा-पाणी जिरवा -
या अभियानात अशासकीय संस्था आणि लोकसहभाग महत्त्वाचा मानला जातो. अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे मौदा तालुक्यात पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने कृषी क्षेत्रावर त्याचा विपरित परिणाम होता. पाण्याच्या पुरेशा उपलब्धी अभावी कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनात फरक विपरीत दिसून येत होता. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणारी ही परिस्थिती बदलण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान समन्वयाने आणि नियोजनबद्ध राबविण्यात आले. पाणी अडविणे आणि जिरविण्यासाठी जलसंधारणाच्या राबविलेल्या विविध प्रणालीमुळे पाणी टंचाईवर मात करण्यास मदत झाली आहे. याचा फायदा आता मौदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसून येतो आहे.
'जलयुक्त शिवार' अभियानाचे काही प्रमुख उद्देश -
- भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होण्यासाठी पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे
- राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करुन शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे
- सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वता निर्माण करणे
- भूजल अधिनियमाची अंमलबजावणी विकेंद्रीत पाणीसाठा निर्माण करणे
- पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे
- अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे आदी जलस्तोत्रांची साठवण क्षमता वाढविणे
- जलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे
- पाण्याच्या ताळेबंदाबाबत आणि कार्यक्षम वापराबाबत प्रभावी जनजागृती तसेच वृक्षलागवडीस प्राधान्य देणे आहे, आदी जलयुक्त शिवाराचे उद्देश आहे.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारची 250 कोटींची मदत