नागपूर - शहरात गेल्या 12 तासात कोरोनाच्या 8 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासह शहरातील एकूण बाधितांची संख्या १५० झाली आहे. या नव्या रुग्णांमध्ये एका 14 महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे.
सतरंजीपुरा कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. दरम्यान 2 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या आता 48 झाली आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण 11 मार्चला समोर आला होता. त्यानंतर आज 52 दिवसांनंतर कोरोना रुग्णांची संख्या 150 वर पोहचली. आज नव्याने पुढे आलेले सर्व आठ रुग्ण सतरंजीपुरा भागात राहणारे असून प्रशासनाने त्यांना आधीच क्वारंटाईन केले आहे.
कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. लोकांनी घरातच राहून सुरक्षित राहावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे.