नागपूर - राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात कोरोनाचा धोका आणखी गडद होताना दिसत आहे. आज एकाच दिवशी सर्वाधिक 14 जणांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागपमधील कोरोना बाधितांना एकूण आकडा 41वर पोहचला आहे, अशी माहिती पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. वाढणारी आकडेवारी पाहता नागपूरच्या चिंतेत वाढ झाली आहे.
हेही वाचा- ईटीव्ही भारत विशेष : कोरोना आणि लॉकडाऊनचा महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रावरील परिणाम
ज्या 14 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामधील 9 जण हे नागपूर शहरातील आहेत. तर एक जण नागपूर जिल्ह्याच्या कामठी येथील रहिवासी आहे. उर्वरित 4 रुग्ण हे मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील रहिवासी आहेत. या सर्वांचा दिल्ली येथील तबलिगी जमातशी थेट संबंध असल्याची माहिती पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.
एक एप्रिलला 52 लोकांना मरकझ येथून नागपुरला परत येताच जिल्हा प्रशासनाने इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले. त्यांना आमदार निवास येथे ठेवले होते. त्यापैकी आज 14 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या थेट 41 वर जाऊन पोहचली आहे. अचानक वाढलेली ही आकडेवारी नागपूरकरांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे नागरिकांनी शासन आणि प्रशासनाच्या सूचना मानून घरीच राहावे, असे आवाहनही तुकाराम मुंढे यांनी केले आहे.