नागपूर - 'कोरोनाचा नवीन विषाणू विध्वंसक नाही. कोरोना गेला, लसीकरण नाही केले तरी चालेल', अशा भ्रमात नागरिकांनी राहू नये. एका महिन्यात कोरोना बाधितांची मृत्यु संख्या 135 झाली आहे ( 135 deaths in a month due to corona in Nagpur ). त्यामुळे लसीकरण हाच एकमेव उपाय असून नागरिकांनी दुसरा डोस पूर्ण करावा, अशी आग्रही मागणी जिल्हाधिकारी आर. विमला ( Collector R. Vimala ) यांनी केली आहे.
2 जानेवारीपासून 135 मृत्यूमुखी -
कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात वाढली आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या निरंक (शून्य) होती. नवीन वर्षात 2 जानेवारी पासून मृत्युमुखी पडण्याच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. २ जानेवारी पर्यंत दुसऱ्या लाटेत मृत्यू संख्या 10 हजार 123 होती. 1 फेबुवारीला ही संख्या 10 हजार 258 आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरात ही संख्या अधिक आहे. गेल्या महिन्याभरात नागपूर महानगर क्षेत्रातील शंभरावर लोकांचा यात समावेश आहे. ही संख्या दुर्लक्षित करता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या आहेत.
लसीकरणाशिवाय उपाय नाही -
भारतात आतापर्यंत आलेल्या साथीमध्ये लसीकरण हेच प्रभावी ठरले आहे. प्लेगची साथ लसीकरणानंतरच नियंत्रणात आली. त्यामुळे लसीकरण न केलेल्या नागरिकांना अनेक रोगांची लागण होत आहे. कोरोना विषाणू लसीकरण न झालेल्या नागरिकांना धोकादायक ठरत आहे. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे विश्लेषण केले असता, ज्यांचे लसीकरण झाले नाही अशांनाच कोरोनाने ग्रासले असल्याचे दिसून आले आहे.
5 लाख लोकांना धोका
नागपूर जिल्ह्यात आजपर्यंत 98.58 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. 68.31 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. म्हणजेच जिल्ह्यामध्ये जवळपास पाच लाख नागरिकांनी दुसरा डोस घेतला नाही. ही पाच लाख लोकसंख्या कोरोनासाठी पूरक आहे. त्यामुळे जिल्ह्याचे आरोग्य सांभाळण्यासाठी या सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. जोपर्यंत 100% लसीकरण होणार नाही. तोपर्यंत अनेक निर्बंध जिल्ह्यात कायम राहणार आहे. प्रशासन आपल्या पद्धतीने या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे काम करत आहे. नागरिकांनी देखील आरोग्य यंत्रणेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.