नागपूर : बाबांच्या गाडीवरून घरी निघालेल्या ११ वर्षीय चिमुकल्याचा मांजामुळे गळा कापला गेला. त्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. वेद शाहू असे चिमुकल्याचे नाव आहे. तो जरीपटकातील महात्मा गांधी शाळेत पाचव्या इयत्तेत शिकत होता. तर दुसरीकडे पतंग पकडण्याच्या नादात रेल्वेखाली येऊन एकाचा मृत्यू झाला आहे.
मांजा वेदच्या गळ्याभोवती अडकला : वेद कृष्णा साहू (११) हा चिमुकला वडिलांसोबत त्यांच्या ऍक्टिवा गाडीने शाळेतून घरी जात होता. वेद हा गाडीवर समोर बसला होता. घरी जात असताना पतंगीचा मांजा वेदच्या गळ्यात अडकला. पलीकडून तो मांजा ओढल्यामुळे वेदचा गळा कापला गेला. वेदच्या मानेतून प्रचंड रक्तस्राव सुरू झाला. अचानक घडलेल्या घटनेत काय नेमके काय आणि कसे घडले हे देखील कळले नाही. स्थानिकांच्या मदतीने वेदला जरीपटकाच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रक्तस्राव अधिक प्रमाणात होत होता.
शस्त्रक्रियेनंतरही वाचू नाही शकला वेद : वेदच्या मानेतून रक्तप्रवाह मोठ्या प्रमाणात होत होता. रक्तप्रवाह करणारी आणि श्वास घेण्याची नस कापली गेली. त्यामुळे डॉक्टरांनी वेदच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. मात्र, रक्तस्राव फार अधिक झाल्यामुळे वेदचा मृत्यू झाला. अशा अनेक घटना शनिवारी आणि रविवारी राज्यभरासह देशभरात घडल्या आहेत.
रेल्वेच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू : पंतग पकडताना रेल्वेखाली चिरडून १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. घटना धंतोली पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभार टोली परिसरात घडली. वंश प्रवीण धुर्वे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. वंश हा भिडे हायस्कूलमध्ये सातव्या वर्गात शिकत होता. वंश हा मुलांसह रेल्वे रुळाजवळ खेळत होता. यावेळी कटलेली पतंग पकडण्यासाठी वंश धावला. मात्र पतंग पकडण्याच्या नादात वंश थेट रेल्वे रुळावर जाऊन पोहोचला. याचवेळी त्याचा पाय रेल्वे रुळात अडकला आणि समोरून आलेल्या रेल्वेखाली तो चिरडला गेला.
मांजामुळे गळा कापला, १६ टाके लागले : पतंगबाजीमुळे शहरात गळा कापण्याच्या अनेक घटना घडल्या. गेल्या आठवड्यात एका चिमुकलीचा जीव या मांजामुळे जाता जाता वाचला. दुपारी शाळेतून आल्यानंतर घरापुढे खेळत असताना शबनाजच्या गळ्याभोवती मांजा अडकला. पतंग उडविणाऱ्यांकडून तो जोरात ओढला गेल्याने शबनाजचा गळाच कापला गेला. रक्तबंबाळ झालेली शबनाजला रुग्णालयात दाखल केले सुदैवाने थोडक्यात तिचा जीव वाचला. तिच्या गळ्याला १६ टाके पडले होते.
छुप्या मार्गाने नायलॉन मांज्याची विक्री : मकरसंक्रांतीनिमित्त शहरात पतंगबाजीचा उत्साह शिगेला पोहचला होता. मात्र, ही पतंगबाजी जेवढा आनंद देते, त्यापेक्षा अधिक दुःख, वेदना आणि त्रासदायक ठरते आहे. याचे कारण म्हणजे नायलॉन मांजा आहे. जीवघेणा ठरत असलेल्या या नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असताना देखील छुप्या मार्गाने नायलॉन मांजाची विक्री झाली. नागपूर पोलिसांनी गेल्या आठ दिवसात लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला. विक्रेते आणि ग्राहकांना जराही कायद्याची भीती नसल्याने नायलॉन मांजा सर्रासपणे विकण्यात आला.
पोलिसांचा कारवाईचा देखावा : पतंगबाजी करताना नायलॉन मांजा वापर होत असेलेल्या भागात ड्रोन कॅमेराच्या मदतीने तपासणी करण्यात येणार होती . बिट-मार्शलला देखील कारवाईचे निर्देश देण्यात आले, असे निर्देश पोलिसांकडून देण्यात आले होते. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या डीलर्सवर कारवाई करणार, अश्या अनेक घोषणा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केल्या होत्या. मात्र या घोषणा हवेत विरल्याचे दिसून आले.
मांजावर रासायनिक प्रक्रिया : मकरसंक्रांतीचा सण शहरात तसेचं ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात पतंग उडवून साजरा करतात. या सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात नायलॅान मांजाची खरेदी आणि विक्री केली जाते. हा मांजा नायलॅान धाग्यापासून तयार करण्यात येतो. त्यावर रासायनिक प्रक्रिया करून अत्यंत मजबूत बनविला जातो. त्यामुळे हा मांजा सहजा तुटत नाही व काही वर्षे तसाच टिकून राहतो.