मुंबई : मोहम्मद फजल सिद्दिक गिलीटवाला (50), मोहम्मद रफी अहमद मोहम्मद रफीक उर्फ समीर (37) विशाखा विश्वास मुधोळे या तीन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून 15 लाख रुपयांची रोख रक्कम आणि अडीच किलो सोने अशी मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी अन्य तीन आरोपींचा तपास पोलीस करत आहेत.
असा घडला घटनाक्रम : तक्रारदार यांचा झवेरी बाजार येथे व्ही. बी. एल बुलीयन नावाने सोने दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. 23 जानेवारीला साधारण दुपारी २च्या सुमारास तक्रारदार आणि त्यांचे कामगार कार्यालयात काम करीत असताना दुपारच्या सुमारास जेवण्याच्या वेळी दोन अनोळखी इसम हे दुकानात जबरदस्तीने आत आले. त्याचवेळी आत प्रवेश केलेल्या दोन इसमांपैकी एका इसमाने कामगार माली याच्या कानशिलात मारले. त्यानंतर तक्रारदार व्यावसायिकाने त्या दोन इसमांना तुम्ही कोण आहात असे विचारले असता त्यांपैकी एका इसमाने तो ईडी कार्यालयाकडून आले असल्याचे सांगून त्यांनी विराटभाई कुठे आहे असे विचारले. तक्रारदार आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व कामगारांचे मोबाईल तोतया अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यापैकी एका इसमाने फिर्यादी याचे कार्यालयावर ईडीने धाड टाकली असल्याचे सांगितले. तसेच कार्यालयातील रोख रक्कम, सोने व इतर किमती वस्तू एकत्रित करावयास सांगितले. त्यावेळेस तक्रारदार यांनी त्यांचेकडे किरकोळ सोने आहे असे सांगितले असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडील कपाटाची चावी जबरीने काढून घेतली. त्यानंतर त्या दोन इसमांपैकी एकाने समोरील कपाट त्यांनी दिलेल्या चावीने उघडून कपाटातील पैसे असलेल्या तिन्ही बॅग त्यांनी घेतल्या. या बॅगेत एकूण २५ लाख रुपये होते.
आरोपींनी सोने लुटले : त्यानंतर त्या दोन्ही इसमांनी तक्रारदार यांच्या दुकानात काम करणाऱ्या कामगारांचे जबरदस्ताने खिसे तपासण्यास सुरुवात केली. सर्व कामगार हे त्यांना विरोध करत होते. दरम्यान कामगार माली यांचे खिश्यामध्ये असलेले २.५ किलो (२२ कॅरेट) वजनाचे सोने आणि कार्यालयात कांउटरमध्ये असलेले ५०० ग्रॅम सोन्याची लगड त्यांनी जबरीने काढून घेऊन दशरथ माली यांच्या देखील जोरात कानशिलात मारली. यावेळी तक्रारदार त्यांना पुन्हा 'तुम्ही कोण आहेत व इतर कागदपत्रे दाखवा असे त्यांना सांगितले असता, तुमको जान से मार डालूंगा' अशी धमकी देऊन कामगार दशरथ माली याचे हातात हातकडी घातली. त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या दुकानातील घेतलेले रोख रुपये आणि सोने तसेच मोबाईल्स फोन घेऊन तसेच तक्रारदार व कामगार यांना देखील ताब्यात घेऊन ते बिल्डींगच्या खाली आले.
24 तासांत लावला छडा : यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे काका यांना बोलावून घेवून त्या परिसरात ईडी अधिकाऱ्यांचा शोध घेतला. परंतु, ते सापडले नाहीत म्हणून फिर्यादी यांनी आजुबाजुच्या व्यापाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर घडलेली घटना पोलीसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि या घटनेच्या अनुषंगाने तक्रारदार यांचा सविस्तर जबाब नोंद करुन लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ३९४, ५०६ (२), १२०(ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तोतया ईडी अधिकाऱ्यांनी डल्ला मारलेली 25 लाखांची रक्कम आणि तीन किलो सोने यापैकी काही मुद्देमाल हा वरळी येथील मित्राकडे ठेवला असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांच्या पथकाने या घटनेचा तपास करून दोन कोटींपैकी 15 लाखांची रोख रक्कम आणि अडीच किलो सोने वरळी येथून जप्त केले. त्याचप्रमाणे उर्वरित मुद्देमालाचा तपास पोलीस करत आहेत. अटक महिला विशाखा मुधोळे तिच्यावर याआधी देखील चेक बाउन्स झाल्याचा गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचे अनुषंगाने गोपनीय माहीतीच्या आधारे गुन्हा घडल्यानंतर २४ तासाचे आत ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच इतर तीन आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत
मुद्देमाल हस्तगत : आरोपी मोहम्मद फजल सिद्दीक गिलीटवाला हा डोंगरी येथील सोनावाला बिल्डींगमध्ये तर मोहम्मद रजी अहमद मोहम्मद रफीक उर्फ समीर मालाड येथे राहत असून या आरोपींना पहिले अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन आरोपींच्या कसून केलेल्या चौकशीअंती विशाखा मुधोळे हिला अटक करण्यात आली. आरोपी विशाखा ही रत्नागिरीतील खेड तालुक्यात पान गल्ली येथे राहणारी आहे. या गुन्ह्यामधील अटक आरोपींकडून चोरी केलेले रोख रुपये १५ लाख व २.५ किलो सोने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हेही वाचा : Video पैशांची पिशवी घेऊन आला, उड्डाणपुलावरूनच उधळले पैसे.. गोळा करायला झाली गर्दीच गर्दी, पहा व्हिडीओ