मुंबई - वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येने आरोग्य सेवेवर मोठा ताण पडला असून सामान्य आजाराच्या रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. उपनगरातील कांजूरमार्ग येथील एका 25 वर्षीय युवकाला क्षयरोगावर उपचार वेळेत मिळत नसल्याने त्याची तब्येत बिघडत चालली होती. आज सकाळी रुग्णालयात हलविण्यासाठी कुटुंबाने रुग्णवाहिकेसाठी बरेच प्रयत्न केले मात्र शेवटी ती आली नसल्याने त्याचा घरातच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
कांजूरमार्ग परिसरातील कर्वेनगरमध्ये राहणारा सुशांत साळुंखे हा काही दिवसांपासून क्षयरोगाने त्रस्त होता. आज सकाळी त्याची परिस्थिती अगदी खालावली असल्याने त्याच्या कुटुंबाने रुग्णालयात उपचाराकरिता घेऊन जाण्याकरिता 108 या क्रमांकावर सकाळी 9 वाजेपासून संपर्क साधला. मात्र, ती उपलब्ध झाली नाही. कुटुंबातील सदस्याने पोलिसांना विनंती केली. मात्र, 5 तासांपेक्षा जास्त वेळ होऊनदेखील रुग्णवाहिका मिळाली नसल्याने उपचारापूर्वीच सुशांत साळुंखे या तरुणाचा मृत्यू झाला. दुपारी 3 वाजता रुग्णवाहिका घरी आली.
दरम्यान, वेळेत रुग्णवाहिका आली असती तसेच रुग्णालयात उपचार झाले असते तर माझ्या मुलाचा जीव नक्की वाचला असता, अशी भावना मृत तरुणाच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. मुंबईत कोरोना संकटाचा सर्वच यंत्रणांवर किती ताण पडतो आहे या घटनेवरून दिसत आहे तर पालिकेच्या रुग्णालयातील चित्रफिती समाजमाध्यमांवर पाहून चिंतेत आणखी भर पडत आहे.