मुंबई - कोरोना लॉकडाऊनमध्ये शंभर दिवसांपेक्षा अधिक काळ सर्वजण घरातच बंद होतो. आता अनलॉकला सुरुवात झाली असली तरीही अनेक जण अद्याप घरात कोंडून आहेत. सर्व शाळा-कॉलेज बंद आहेत कामगार कपातीमुळे अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. अशा परिस्थितीमुळे तरुण मुले मानसिकदृष्टया कमकुवत होत चालली आहेत. तरुणांच्या एका मोठ्या संख्येला नैराश्याने ग्रासले आहे. अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. या तरुण पिढीला नैराश्य-दडपणातून बाहेर काढायचे असेल तर त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. सोबतच त्यांना मेडिटेशनचाही उपयोग होऊ शकतो, असे मत मानसोपचारतज्ञ व्यक्त करत आहेत.
देशात कोरोनाचा शिरकाव झाला व त्यानंतर प्रदीर्घ लॉकडाऊन घोषित झाले. सुरवातीला घरी रहायला मिळणार म्हणून सर्वांनाच चांगले वाटले. मात्र, काही दिवसानंतर मात्र कंटाळा येऊ लागला व कोरोनाची भीतीही वाढू लागली. आपल्याला कोरोना होणार नाही ना? या विचारातून अनेकांनी जीवही दिला. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने तरुण मुले मोबाईलमध्ये आणि समाज माध्यमांमध्ये अधिकाधिक अडकून राहू लागली. कालांतराने त्याचाही वीट आला आणि या मुलांमध्ये मानसिक आजाराचे प्रमाण वाढीस लागल्याची माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी दिली.
आपल्याकडे नोकरी करणारा तरुण वर्गही मोठ्या संख्येने आहे. लॉकडाऊनमध्ये कामगार कपातीमुळे अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत तर अनेकांना नोकरी जाण्याची भीती आहे. वर्क फ्रॉम होम करणाऱयांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा एक ना अनेक समस्यांमुळे तरुण वर्ग नैराश्यात जात आहे, असेही डॉ. मुंदडा म्हणाले. चिंतेची बाब म्हणजे अशा रुग्णांना वेळेवर योग्य ते उपचार मिळाले नाही तर ते आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेत आहेत. सध्या उपचारासाठी येणाऱ्या 10 रुग्णांपैकी 4 रूग्ण तरुण असल्याचे डॉ. मुंदडा यांनी सांगितले.
तरुण पिढी मानसिक आजराला बळी पडणे ही चिंतेची बाब आहे. याकडे लवकरात लवकर गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. अशा वेळी कुटुंबीयांची भूमिका महत्त्वाची ठरते. मुलांकडे किंवा नैराश्यात गेलेल्या सदस्यांकडे बारीक लक्ष ठेवत त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. संवाद आणि विश्वास या गोष्टी गरजेच्या असतात. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या मुलांसोबत संवाद साधत त्यांच्यात विश्वास आणि सकारात्मकता निर्माण करायला हवी. मानसिक तणावात असलेल्या रुग्णांना सारखे कशात तरी गुंतवून ठेवणे आवश्यक असते. अशा वेळी मेडिटेशनही खूप उपयोगी ठरू शकते, असा सल्ला डॉ. मुंदडा यांनी दिला.
कोरोनाचे संकट कधी टळेल आणि सर्व कधी सुरळीत होणार? याचे उत्तर कुणाकडेच नाही. त्यामुळे या संकटातही मानसिकदृष्ट्या आपण कसे खंबीर राहू यावरच लक्ष देत त्यादृष्टीने प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.