मुंबई : अमर अशोक सोलंके (वय २४) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुंबईत पोलीस भरतीसाठी राज्यभरातून अनेक तरुण दाखल झाले आहेत. पोलीस भरतीसाठी मुंबईत आलेल्या उमेदवाराच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमर अशोक सोलंके हा तरुण अमरावती येथील नवसारीत राहणारा होता. तो पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीसाठी मुंबईत आला होता.
बेशुद्ध होऊन खाली कोसळला : अमर फोर्ट परिसरातली रेसिडन्सी हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. अमरने मंगळवारी शारीरिक चाचणी दिल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटत असल्याचे ओळखीच्या व्यक्तीला सांगितले होते. नंतर सायंकाळी पाचच्या सुमारास अमर सोलंके हॉटेलमध्ये आंघोळ करत असताना त्याला उलटी झाली आणि तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
शर्यतीत धावताना गणेशचा झाला होता मृत्यू : मुंबई विद्यापीठाच्या मैदानावर भरतीसाठी शारीरिक चाचणीच्या १६०० मीटर शर्यतीत भाग घेतलेल्या गणेश उगले या उमेदवाराचा रनिंग ट्रकमध्ये चक्कर येऊन कोसळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती बीकेसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्राम अभ्यंकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली होती. गणेश उगले हा पोलीस होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून मुंबईत आला होता. तो शेतकरी कुटुंबातील होता.
रनिंग ट्रॅकवर कोसळला : बीकेसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्राम अभ्यंकर सांगितले होते की, गणेश उगले हा चक्कर येऊन खाली कोसळला. तेव्हा त्याच्यासोबत आलेला त्याचा चुलत भाऊ देखील घटनास्थळी उपस्थित होता. गणेशने पोलीस ड्रायव्हर कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज केला होता आणि तो आदल्या दिवशी दुपारी वाशीमहून मुंबईत शहरात आला होता. त्यानंतर तो दादर येथील आपल्या नातेवाईकांकडे राहिला. रात्रीचे जेवण करून झोपला आणि शुक्रवारी सकाळी नाश्ता करून मुंबई पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणी प्रक्रियेत सहभागी झाला. सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास उमेदवाराने १६०० मीटर शर्यतीत भाग घेतला. गणेशने धावत जाऊन १६०० मीटर अंतर कापले. मात्र, दुर्दैवाने अंतिम रेषा ओलांडताच तो रनिंग ट्रॅकवर कोसळला. ऑन-ड्युटी वैद्यकीय पथकाने गणेशची तपासणी केली होती. त्यानंतर त्याला सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.