मुंबई - राज्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसचे काही तरुण आमदार आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. यात आमदार सुनील केदार, आमदार विश्वजीत कदम, आमदार सुनील केदार आदींनी पुढाकार घेतला असून यांच्यासोबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लीकर्जून खर्गे हेही दिल्ली येथे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बुधवारी सायंकाळी वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि तरुण आमदार यांची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसच्या अनेक तरुण आमदारांनी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने तातडीने पावले उचलावीत आणि आवश्यकता पडल्यास शिवसेनेला पाठिंबा द्यावा, अशी मागणी लावून धरली होती. दरम्यान, मागणीसाठी तयार केलेले निवेदन घेऊन राज्यातील काही तरुण आमदार आज दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचीे माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - भाजपला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे - अशोक चव्हाण
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यातच माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी पक्ष योग्य भूमिका बजावेल असे विधान केले आहे. त्यामुळे आज दिल्ली येथे होणाऱ्या या भेटीनंतर काँग्रेसची राज्यातील भूमिका स्पष्ट होईल असेही बोलले जात आहे.