मुंबई - बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 12 वर्षांच्या यश वाघाचे कर्करोगाने बुधवारी निधन झाले आहे. यश वाघाला दत्तक योजने अंतर्गत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी 2013मध्ये दत्तक घेतले होते. यशला कॅन्सर झाला होता. त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही.
यशला स्नायूच्या कर्करोगाचे निदान झाले होते. कर्करोगाशी संबंधित असणाऱ्या समस्या आणि अवयव निकामी होत गेल्याने यशचा मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून देण्यात आली. उद्यानातील व्याघ्र सफारीतील बसंती व पलाश या जोडीच्या मिलनातून 2008 ला यशचा जन्म झाला होता.
गेल्या वर्षभरापासून ओठावर येणाऱ्या गाठीमुळे तो त्रस्त होता. गेल्यावर्षी जून महिन्यात यशच्या ओठावर ग्रन्युलोमा गाठ आली होती. या गाठीवर शस्त्रक्रिया करुन ती काढण्यात आली. परंतु, मार्च महिन्यात पुन्हा एकदा या वाघाच्या खालच्या ओठावर डाव्या बाजूला गाठ निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी देखील शस्त्रक्रिया करुन 400 ग्रॅमची गाठ काढण्यात आली. या गाठीची तपासणी करण्याचे काम परळच्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील रोगनिदान तज्ज्ञांना देण्यात आले होते. या गाठीची तपासणी केल्यानंतर या वाघाला कर्करोगाचे निदान झाल्याचे समोर आले होते.
मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजता यशचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील रोगनिदानतज्ज्ञांनी त्याचे शवविच्छेदन केले. टॅक्सीडर्मीच्या माध्यमातून पर्यटकांसाठी यशचे जतन केले जाणार आहे. यापूर्वी 3 मे रोजी बाजीराव या पांढऱ्या पट्टेरी वाघाचा दीर्घकालीन आजारामुळे मृत्यू झाला होता. या महिन्याभरात राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र सफारीतील हा दुसऱ्या वाघाचा मृत्यू आहे.