मुंबई - वरळी, कोळीवाड्यामध्ये कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्याने हा परिसर सोमवारी सील करण्यात आला. या परिसराचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही हा परिसर बंद ठेवण्यात आला आहे. रहिवाशांना अत्यावश्यक काम असल्यास बाहेर सोडल्या जात आहे, तर कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला आत प्रवेश दिला नाकारला जात आहे.
देशात कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे, तर महाराष्ट्रात हीच संख्या २२५ वर पोहोचली आहे. तसेच मुंबईत सर्वाधिक रुग्ण असल्याने खबरदारी घेतली जात आहे. सोमवारी मुंबईतील गजबजलेला आणि दाटीवाटीचा परिसर वरळी, कोळीवाड्यात ५ संशयित रुग्ण आढळून आले. त्यांना क्वारंनटाईन करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले असून आज रात्री उशिरापर्यंत त्यांचे अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच ते कोरोनाबाधित आहेत का? हे स्पष्ट होणार आहे.
ईटीव्ही भारतने या परिसराचा आढावा घेतला असता परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. तसेच मुख्य रस्ता अद्यापही सील करून ठेवला आहे. तसेच कुठल्याही व्यक्तीला परिसरात प्रवेश करू दिल्या जात नाही.