मुंबई: आजही आयुर्वेदा खूप महत्व आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध उपचार पद्धती वापरल्या जातात. यामध्ये आता आधुनिक विज्ञानाची असलेली ऍलोपॅथी सर्वात जास्त वापरली जाते. कारण यामुळे ताबडतोब रुग्णाला फायदा होतो. मात्र असे अनेक आजार आहेत, ज्यामध्ये ऍलोपॅथीकडे उत्तर नाही. असे आजार आयुर्वेदात बरे होतात. कोणत्याही अन्य विपरीत परिणामांशिवाय असा दावा, डॉक्टर रेवन बागल यांनी केला आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयुर्वेद विषयाचे महत्त्व डॉक्टर रेवन बागल यांच्याकडून जाणून घेऊया.
आयुर्वेद आहे फायदेशीर: जागतिक आरोग्य दिनानिमित्त विविध उपचार पद्धती बाबत जन माणसांमध्ये काय समज आहे. रुग्णांना कोणती उपचार पद्धती फायदेशीर आणि किफायतशीर ठरते, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू असतात. याबाबत आयुर्वेदाविषयी डॉक्टर बागल सांगतात की, आयुर्वेदाचा जर विचार केला आयुर्वेदामध्ये मनोकायिक चिकित्सा, रुग्णबल, तसेच आपली जी सिस्टीम आहे, ती सुधारण्यासाठी द्रव्यांचा वापर केला जातो. कित्येकदा रुग्णांच्या मनामध्ये अनेक समजुती पक्या बसलेल्या असतात. काहीतरी कारणामुळे आपल्याला हे होत आहे, असे त्यांना वाटते. बरेचसे आजार हे मनात असतात. आयुर्वेद हे मन, सिस्टीम आणि आजार या तिन्हींवर काम करते. त्याच्यामुळे आपण मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या बरे होतो.
अनेक व्याधीच्या लक्षणांवर काम: खरंतर रुग्णांना बरे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपचार पद्धती ह्या आपापल्या ठिकाणी योग्य आहेत. ऍलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी या सर्रास वापरल्या जाणाऱ्या उपचार पद्धती आहेत. ऍलोपॅथी मध्ये व्याधीच्या लक्षणांवर काम केले जाते. व्याधी उत्पन्न झाल्यानंतर तिच्या लक्षणांवर ऍलोपॅथी काम करते. असे डॉक्टर बागल सांगतात.
आयुर्वेदाचे वेगळेपण काय?: आयुर्वेदामध्ये दोषानुसार उपचार केला जातो. माणसाच्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ असे त्रिदोष असतात. यापैकी कुठल्याही एका दोषाचे प्रमाण जास्त झाले तर व्याधी उत्पन्न होतात. आयुर्वेदामध्ये व्याधीच्या मूळ कारणाचा विचार केला जातो. यामध्ये आहार पद्धती, विहार पद्धती, जीवनशैली कशा पद्धतीचा प्रामुख्याने विचार होतो. यानुसार वाढलेल्या दोषांवर उपचार केले जातात. त्यानुसार ते दोष हळूहळू कमी होत नष्ट होऊन जातात. ब्रेन हेमरेज असेल किंवा हृदयविकार असेल या ठिकाणी आधुनिक विज्ञानाचा वापर केलाच पाहिजे. काही आजारांना ऍलोपॅथी मध्ये याेग्य असे चिकित्सा नाहीत.
कोणत्या आजारांवर आयुर्वेदात उपाय?: काही विशिष्ट आजारांमध्ये ऍलोपॅथी ही केवळ शस्त्रक्रियेवर भर देते, मात्र आयुर्वेदात त्यावर उपचार पद्धती आहेत. उदाहरणार्थ मुतखडा या आजारावर ऍलोपॅथी मध्ये शस्त्रक्रिया हा पर्याय आहे. मात्र आयुर्वेदात अशा काही वनस्पती आहेत, ज्यांच्या आधारे मुतखड्यावर उपचार करून मुतखडा विरघळून टाकला जातो. त्वचारोगांवरती सुद्धा ऍलोपॅथी मध्ये एका विशिष्ट मर्यादेपर्यंत औषध आहेत. मात्र आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यावर हमखास उपाय करता येतो. कावीळ या आजाराबाबतही तसेच आहे. ऍलोपॅथी मध्ये यावर नियंत्रण आणता येते. मात्र आयुर्वेदाच्या माध्यमातून कावीळवर उपचार करून हा आजार बरा करता येतो.
आयुर्वेदाचा साईड इफेक्ट नाही: आयुर्वेदामध्ये वापरल्या जाणाऱ्या वनस्पती या दैनंदिन वापरातल्या असल्यामुळे, त्यांच्या सेवनाने शरीरावर कुठलेही अन्य विपरीत परिणाम होत नाही. असा दावा डॉक्टर बागल यांनी केला आहे. त्यामुळे आयुर्वेदाला महत्त्व खूप आहे. त्याची जनजागृती होणे गरजेचे आहे. आजही अनेक आजारांवर आयुर्वेदिक उपचार फायदेशीर ठरत आहेत. तसेच सध्या प्रचंड धावपळ, ताणतणाव यामुळे मानसिक विकारांचे प्रमाण वाढत आहे.