मुंबई - दोन वर्षापूर्वी अंधेरी येथील रेल्वे स्थानकाजवळील गोखले पूलाचा काही भाग कोसळला होता. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या पुलाचे बांधकाम करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून, घेण्यात आला आहे. पूल नव्याने बांधण्यासाठी 112 कोटी रुपयांचा खर्च पालिका करणार आहे. अंधेरी पूर्व-पश्चिमेला जाण्यासाठी नागरिकांना, वाहन चालकांना त्रास होऊ नये म्हणून एका बाजुचे काम पूर्ण होताच दुसऱ्या बाजुचे काम हाती घेतले जाईल, अशी माहिती पालिकेच्या पूल विभागातील अभियंते राजेंद्रकुमार तळकर यांनी दिली.
टप्या-टप्प्याने पुलांची कामे सुरू
अंधेरी स्थानकाजवळील पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल दोन वर्षांपूर्वी कोसळला होता. या दुर्घटनेत दोन जणांना जीव गमवावा लागला. दोन वर्षांपूर्वी कोसळलेल्या या पुलाचा काही भाग पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत येत असून पुलाच्या कामासाठी विविध प्राधिकरणाच्या परवानग्या रखडल्या होत्या. पालिकेने सतत पाठपुरावा करत परवानग्या मिळवल्या आणि काम सुरू करणार असतानाच मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. यामुळे अनेक पुलांची कामे रखडली होती. टप्या-टप्प्याने पुलांची कामे सुरू केली असून मे 2021 पर्यंत 296 पैकी अनेक पुलांचे मजबुतीकरण झालेले असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काम दोन टप्प्यात
गोखले पुलाच्या कामासाठी विविध प्राधिकरणाच्या रितसर सगळ्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. अंधेरीचा हा महत्त्वपूर्ण पूल असल्याने अचानक पूर्ण बंद केल्यास वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होईल. त्यामुळे गोखले पुलाचे काम दोन टप्प्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात कुठल्याही एका बाजुचे काम सुरू करण्यात आले तरी संपूर्ण पूल बंद न करता दुसरी बाजू वाहतुकीस खुली ठेवण्यात येईल. यामुळे वाहतूक कोंडीची थोडीफार समस्या दूर होईल आणि पुलाचे काम सुरु राहिल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - दुर्घटनाग्रस्त हिमालय पूल 'स्टेनलेस स्टील'चा बांधणार, पालिका करणार 7 कोटीचा खर्च
हेही वाचा - विना मास्क फिरणार्या ४ लाख ८५ हजार नागरिकांवर कारवाई; १० कोटी ७ लाखाचा दंड वसूल