मुंबई - संपूर्ण देशात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. मुंबईतही कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत काही ठिकाणी गणपती बसवण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी सामाजिक संदेश देत गणेशाच्या वेगवेगळ्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. मुंबईतील दहिसर भागातील महिलांनी 36 हजार कागदी फुलांपासून गणेशाची प्रतिमा साकारली आहे.
मुंबईतील दहिसर भागात दिव्यांग महिलांच्या सहभागातून गणपतीची प्रतिमा बनवण्यात आली आहे. 36 हजार कागदी फुलांचा वापर करुन प्रतिमा बनवण्यात आलीय. यामध्ये 6 वेगवेगळ्या रंगाच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. ही प्रतिमा 11 फूट उंच आणि सुमारे 8 फूट रुंदीची आहे. मुंबईतील लालबागचा राजाची प्रतिकृती साकारण्यात आली. प्रतिमेची निर्मिती करताना 5 दिव्यांग महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे कलाकार श्रृतिका शिर्के यांनी सांगितले.
लॉकडाऊनमध्ये प्रतिमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य अनेक दुकांनामध्ये उपलब्ध झाले नाही. मात्र,विविध ठिकाणांहून साहित्य गोळा करुन पेपर आणि इतर वस्तूंची बाप्पाची कलाकृती आम्ही बनवली असल्याचे श्रृतिका शिर्के यांनी म्हटले. दिव्यांग महिलांना ही कागदी फुलांपासून बनवलेली कलाकृती शिकवलेली आहे. या कलाकृती निर्मितीतील अनुभवाचा आधार घेत त्या पुढे उदरनिर्वाह करु शकतील. ही प्रतिमा गणेश मंडपात मूर्तीच्या मागे लावलेली आहे. भाविकांकडून या कलाकृतीचे कौतुक करण्यात येत आहे.