मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मागच्या आठवड्यात सुरू झाले. आज अधिवेशनाचा दुसरा आठवडा असून सोबतच आज जागतिक महिला दिन असल्याकारणाने महिला धोरण आज जाहीर केले जाईल अशी शक्यता पहिल्यापासूनच शिंदे - फडणवीस सरकारने वर्तवली होती. परंतु महिला धोरण सध्या खोळंबले आहे. आता हे धोरण २५ मार्चपर्यंत चालणाऱ्या याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सर्वच महिला आमदारांना निराश व्हावे लागणार आहे. महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सुद्धा या अधिवेशनात महिला धोरण आणण्याचे सांगितले होते.
आज महिला प्रतिनिधींना विशेष संधी: आज महिला धोरण जरी जाहीर होणार नसले तरी महिला आमदारांना विशेष संधी कामकाजातून दिली जाणार आहे. आज तारांकित प्रश्न त्याचबरोबर लक्षवेधी सूचना व इतर प्रश्न महिला आमदारांना प्राथमिकतेने मांडण्याची संधी दोन्ही सभागृहात दिली जाणार आहे. यासाठी विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या महिला दिनाच्या विशेष दिवशी तसा प्रस्ताव मांडणार आहेत. त्याचबरोबर महिलांना समाजात समान व सन्मानाचे स्थान भेटावे या अनुषंगाने आजच्या विशेष दिनी संयुक्त राष्ट्रसंघ पुरस्कृत जागतिक महिला आयोगाच्या ६७ व्या सत्राची घोषणा सुद्धा नार्वेकर करणार आहेत.
अधिवेशन संपायच्या आत महिला धोरण जाहीर होणार?: मागील अनेक दिवसांपासून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या विविध प्रश्नांची दखल घेत शिंदे - फडणवीस सरकारकडून महिला धोरण आणण्याची तयारी सुरू आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात महिला धोरणा विषयी अनेक प्रयत्न केले गेले व त्याचा अंतिम मसुदा ही तयार करण्यात आला होता. परंतु महाविकास आघाडी सरकारला या धोरणासाठी मुहूर्त भेटला नसल्याने आता शिंदे - फडवणीस सरकार विशेष करून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे ८ मार्चला महिला दिनाचे औचित्य साधत महिला धोरण जाहीर केले जाईल, असे राज्यातील तमाम महिलांना सोबत महिला प्रतिनिधींना अपेक्षा होती. परंतु आजही महिला धोरण जाहीर होणार नसल्याने राज्यातील तमाम महिलांना निराशा व्हावे लागणार आहे. परंतु हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपायच्या आत शिंदे - फडणवीस सरकार महिला धोरण जाहीर करेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.