मुंबई- कोरोनाच्या महामारीमुळे अनेक सण, उत्सवांवर विरजण पडले आहे. अशातच काही दिवसांवर दहीहंडी उत्सव आला आहे. हा उत्सव आपली परंपरा व संस्कृती जपत असताना सरकारी आदेशाचे उल्लंघन न करता साजरा करण्याचा निर्णय पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला दहीहंडी गोविंदा पथकाने घेतला आहे. पथकाकडून सोशल डिस्टन्सिंग पाळून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याचे प्रात्यक्षिक आज ईटीव्ही भारतच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर गेल्या वर्षी सरकारने अटी व नियम लागू केल्याने अनेक बाळ गोपाळ व गोपिकांना दहीहंडीच्या या थरारक खेळातून माघार घ्यावी लागली होती. तर यंदा कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात उत्सवही साजरा होणार नाही. मात्र, यावर तोडगा काढत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत दहीहंडी उत्सव साजरा करण्याचे पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला दहीहंडी गोविंदा पथकाने ठरविले आहे. अशी माहिती पथकाच्या अध्यक्षा गीता झगडे यांनी दिली.
तसेच, यंदा आमचे 20 वे वर्ष आहे. मात्र, कोरोनामुळे गेल्यावर्षीचा 7 थर लावण्याचा सराव यंदा करता आला नाही. मात्र पुढच्या वर्षी जोमाने सराव करून आम्ही 7 थर लावून आमचा रेकॉर्ड कायम ठेवू, असे गीता झगडे म्हणाल्या. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समितीने एक आव्हान केले होते, त्यानुसार आज पार्ले स्पोर्टस महिला दहीहंडी पथक व पार्लेश्वर ढोल ताशा पथकातील गोपिका व गोविंदांनी रक्तदानही केले.
हेही वाचा- राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये शिवसेनेकडून कर्नाटक सरकारचा निषेध