मुंबई - शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील अंधेरी गुंदवली बस स्टॉपजवळ क्रेन अनियंत्रिक होऊन अपघात झाला. आज (शनिवारी) सकाळी 6 वाजता झालेल्या या दुर्दैवी अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. फाल्गुनी पटेल असे मृत महिलेचे नाव आहे.
आज सकाळच्या सुमारास पूर्व द्रुतगती महामार्गा जवळ जोगेश्वरी पासून बांद्राच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या कामासाठी एक क्रेन रस्त्यावरून जात होते. या क्रेन वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रेन मेट्रोच्या खांबाला जाऊन धडकले. या झालेल्या अपघातामध्ये क्रेनच्या मागील चाकामध्ये फाल्गुनी पटेल नावाची महिला आल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. तर बस स्टॉप जवळ उभे असलेले दोन जण यामध्ये गंभीर रित्या जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे.
ही घटना घडल्यानंतर क्रेनचा ड्रायव्हर हा जागेवरून फरार झाला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत महिलेचा मृतदहे विच्छेदनाकरीता रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेची नोंद करून पोलिसांनी फरार क्रेन चालकाचा शोध सुरू केला आहे.