मुंबई - मुंबईमधील सर्व रुग्णालयांतील ऑक्सिजन प्लांट सीसीटीव्ही लावून सुरक्षित केले जातील. त्या ठिकाणी कोणालाही जाऊ दिले जाणार नाही, अशी माहिती मुंबईच्या महपौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
हेही वाचा - 18 वर्षावरील नागरिकांचे मोफत लसीकरण करा; आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी
ऑक्सिजन प्लांटची सुरक्षा वाढवणार
नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेची पुनरावृत्ती मुंबईत होऊ नये म्हणून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज रुग्णालये आणि कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. या पाहणीदरम्यान महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना, मुंबईमधील सर्व रुग्णालये आणि कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांटच्या आजूबाजूचा परिसर बॅरिकेटिंग लावून सील केला जाईल. त्या ठिकाणी कोणालाही जाऊ दिले जाणार नाही, त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची गस्त वाढवली जाईल, असे महापौरांनी सांगितले.
त्या रुग्णालयात ऑक्सिजन
मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने गेल्या आठवड्यात ६ रुग्णालयांतील १६८ रुग्णांना इतर रुग्णालयांत हलवावे लागले होते. यापैकी कुर्ला भाभा, वांद्रे भाभा आणि गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात प्रत्येकी २०० लिटर ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये पाईपलाईन जोडणे बाकी होते, ते काम काल पूर्ण झाले आहे. आता ऑक्सिजनचा टँकर आल्यावर त्या टॅंकमध्ये ऑक्सिजन टाकणे बाकी आहे. त्यानंतर ऑक्सिजन पुरवठा सुरू होईल, असे महापौरांनी सांगितले.
ऑडिट केले जात आहे
महापालिका रुग्णालये आणि पालिकेने ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णालयांमधील बेडचे ऑडिट केले जात आहे. रुग्णांची सुरक्षा महत्वाची असल्याने आधी काळजी घेतली जात असून सुरक्षा कडक केली जाणार असल्याचे महापौरांनी म्हटले.
हेही वाचा - मातोश्री क्रीडा संकुलात ‘कोविड सेंटर’ सुरू करा, आमदार वायकर यांचे महापालिका आयुक्तांना पत्र