मुंबई : सावरकरांच्या मुद्यावरुन महा विकास आघाडीमध्ये फूट पडू शकते, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. केंद्रात भाजपचे सरकार असूनही वीर सावरकर यांना भारतरत्न अजून का मिळाले नाही ? असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला (Why Savarkar not received Bharat Ratna) आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचे विचार जपले असेही राऊत म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
भारत जोडो यात्रा वादात : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष शिवसेनेतील अनेक नेते नाराज असून, गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण त्यांच्या वक्तव्याच्या समर्थन करत नसल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यानंतर लगेचच महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील ऍक्टिव्ह मोडमध्ये आली. आणि त्यांनी शेगावला जाऊन आपण राहुल गांधींचे निषेध करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे एका छोट्या विधानामुळे महाराष्ट्रात अत्यंत प्रतिसादात चाललेली राहुल गांधींची भारत जोडो यात्रा वादात सापडली आहे. यावर आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले असून राहुल गांधी यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असे म्हटले (BJP government at Centre) आहे.
चुकीचे वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही : यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, आपल्या देशामध्ये तक्रारी दाखल करणे आणि त्याच्या आधारावर प्रसिद्धी मिळवणे हा एक राजकीय उद्योग झाला आहे. त्याच्यामध्ये आमच्यातील काही लोक बळी पडली आहेत. काल शिवसेना पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अगदी स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितले आहे की, वीर सावरकरांची कुठल्याही प्रकारची बदनामी आणि चुकीचे वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही आणि शिवसेना सहन करणार नाही. हे सांगितल्यावर आमचा विषय संपतो.
सावरकरांना भारतरत्न द्यावा : पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, 'राहुल गांधी यांच्या भारत चालू यात्रेला सर्वात जास्त प्रतिसाद हा महाराष्ट्रात मिळाला. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेला धक्का बसला नाही, तर महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाला देखील बसला. वीर सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी आमची मागणी आहे. वीर सावरकर हे भाजपचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रद्धास्थान कधीच नव्हते, असे इतिहास सांगतो. हा विषय काढायची गरज नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे.