मुंबई- भारत-चीन मुद्द्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण करु नये, असे शरद पवार यांनी म्हटले होते. त्यांनी 1962 मध्ये चीनने भारताची 45 हजार स्के.फुट जमीन बळकावली होती याची आठवण राहुल गांधी यांना करुन दिली होती. यावर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात शरद पवार संरक्षण मंत्री होते. त्यावेळी त्यांनी 1962 ची चुक दुरुस्त करायला हवी होती, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.
राहुल गांधी यांनी 27 जूनला चीनने आपली जमीन बळकावली, असे म्हटले होते. त्यावर शरद पवारांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण करु नये म्हणत 1962 च्या चीन युद्धावेळी भारताची जमीन बळकावल्याची आठवण करुन दिली होती. शरद पवार यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर बोलण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत-चीन सैन्यादरम्यान झालेल्या झटापटीवर बोलण्याचा सल्ला द्यावा, असे राऊत यांनी म्हटले.
आम्हाला शरद पवार यांच्या विषयी आदर आहे. त्यांचे नेतृत्व काँग्रेसमध्ये तयार झालेले आहे. शरद पवार काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देतील असे, राऊत म्हणाले आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाला लाईन ऑफ अॅक्शन वर काय झाले हे जाणून घेण्याचा अधिकार आहे, असेही ते म्हणाले.
भारत आणि चीनमध्ये युद्ध होण्याची शक्यता नाही, असे शरद पवार यांनी म्हटले होते.