मुंबई - पोलीस आयुक्त संजय बर्वे हे पदावरून ३१ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. आता मुंबई पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. यातच आता ३ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा होत आहे. मुंबई पोलीस आयुक्तपद हे देशातील इतर पोलीस विभागाच्या आयुक्तपदापेक्षा महत्वाचे आणि मोठे मानले जाते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना ३ महिन्यांची मुदतवाढ मिळणार नसल्याचे सूत्रांकडून कळत आहे. अशातच मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातले म्हणून ओळख असलेले लाचलुचपत विभागाचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. मात्र, गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला आणि रजनीश सेठ आणि डॉ व्यंकटेशन हे 1988 च्या बॅच चे आयपीएस अधिकारीसुद्धा मोठे दावेदार मानले जात आहेत.
डॉ. रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावर नेमल्यास त्या मुंबई पोलिसांच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त ठरतील. मात्र, डॉ. रश्मी शुक्ला यांच्या तुलनेत परमबीर सिंग, व डॉ. व्यंकटेशन हे सेवाकाळात वरिष्ट असल्याने डॉ व्यंकटेशन व परमबीर सिंग यांच्यात शर्यत असल्याचे म्हटले जात आहे.