मुंबई - राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून, भाजप शिवसेना युतीने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा युती करु शकते. जवळपास १६० च्या आसपास जागा युतीकडे आहेत. तसेच काही निवडून आलेल्या अपक्षांचाही भाजपला पाठिंबा मिळू शकतो. मात्र, विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच लागण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा चर्चेचा विषय ठरत आहे.
राज्यात सर्वात जास्त १०५ जागा भाजपला, ५६ जागा शिवसेनेला, ५४ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला तर ४४ जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजप शिवसेनेकडे पुरसे संख्याबळ आहे. त्यांनी जर सत्ता स्थापन केली तर विरोधी पक्षनेतेपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार आहे. कारण काँग्रेसपेक्षा जास्त जागा या राष्ट्रवादीच्या निवडून आल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादीतून विरोधी पक्षनेतेपदासाठी चुरस लागू शकते.
विरोधी पक्षनेते पदासाठी या नेत्यांमध्ये चुरस
१) जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव चर्चेत आहे. पाटील हे सलग सातव्यांदा इस्लामपूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी ९ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यांच्या पाठीशी सभागृहाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते होऊ शकतात.
२) अजित पवार
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत. ते बारामती विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांच्याकडे सभागृहातील दांडगा अनुभव आहे. अजित पवार हे आक्रमक आणि स्पष्टवक्ते आहेत. त्यामुळे ते विधानसभा विरोधी पक्षनेता होऊ शकतात.
3) धनंजय मुंडे
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचेही नाव विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत राहू शकते. त्यांनी यावेळी परळी विधानसभा मतदारसंघातून मंत्री पंकजा मुंडेंचा पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी सातत्याने विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. २०१४ च्या विधानसभेला मुंडेंचा पराभव होऊनही राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेवर घेत विरोधी पक्षनेतेपद दिले होते.
४) छगन भुजबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे देखील विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत असू शकतात. छगन भुजबळ यांच्याकडे ओबीसी समाजाचे नेते म्हणूण बघितले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते पहिले प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी उपमुख्यमंत्री पदासह गृह आणि पर्यटन मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.
५) दिलीप वळसे पाटील
विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले दिलीप वळसे पाटील हेदेखील विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाच्या शर्यतीत आहे. ते सलग सात वेळेस आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देखील मिळाला आहे. वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, अर्थ, ऊर्जा विभागासारखी महत्त्वाची खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला आहे.
राष्ट्रवादीकडून हे ५ नावे विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत राहू शकतात. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवार विरोधी पक्षनेते पदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.