मुंबई - रविवारी टिळक नगर पोलीस निलेश पराडकर याला भोईवाडा कोर्टात केले असून २५ जातमुचल्यावर सुटका करण्यात आली. टिळक नगर पोलीस ठाण्यात हजेरी लावणे, पासपोर्ट जमा करणे तसेच कुठल्याही समाज विघातक कृत्यात सहभागी होऊ नये अशा अटी देखील घातल्या आहेत.
निलेश पराडकर कोण आहे - कोपरी शिवसेनेचे उपविभागप्रमुख राजेश घाडगे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या निलेश पराडकर याला मात्र शिवसेनेचे संपर्क प्रमुख पद देण्यात आले आहे. मोक्काचा आरोपी असलेल्या निलेश पराडकरची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पोलिसांनी भोईवाडा न्यायालयाला सांगितले की, पराडकर यांनी १२-१५ लोकांना जमवून राजनचा वाढदिवस साजरा केला आणि त्यावर राजनचा फोटो असलेला केक कापला. या घटनेच्या व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात म्हटले आहे की, "मी (छोटा राजन) दाऊद किंवा छोटा शकीलला घाबरत नाही आणि 1993 पासून त्यांच्याशी लढत आहे." असे करून आरोपींना परिसरात दहशत पसरवायची होती, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
न्यायालयात युक्तिवाद - पोलिसांनी पराडकर याच्या कोठडीची मागणी केली, ज्यावर त्यांचे वकील हेमंत इंगळे यांनी न्यायालयाला सांगितले की, ज्या आयपीसी कलमांतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती. त्या कलमांतर्गत सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हजर राहण्यासाठी नोटीस बजावायला हवी होती. परंतु पराडकर यांना पोलिस ठाण्यात बोलावून कोणतीही सूचना न देता अटक करण्यात आली.
जामीन मंजूर - न्यायाधीशांनी टिळक नगर पोलीस अधिकाऱ्याला नोटीसबद्दल विचारले, ज्यावर त्यांनी नोटीस दिली नसल्याचे उत्तर दिले. त्यानंतर भोईवाडा न्यायालयाने पराडकर यांना काही अटींसह जामीन मंजूर केला. पराडकर यांना सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान सात दिवस टिळक नगर पोलिस स्टेशनला भेट द्यावी लागेल आणि त्यांचा पासपोर्टही जमा करावा लागेल. त्याला पोलीस ठाण्यातही जावे लागणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार - पराडकर हा बॉलीवूड सिने डान्सर्स असोसिएशनशी संलग्न आहे. जो अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या नावावर पैसे उकळत होता अशी चर्चा आहे. निलेश पराडकर हा तोच आहे जो अंधेरी पश्चिमेकडील सिने डान्सर्स असोसिएशनच्या अंतर्गत पैसे उकळत असे. या खंडणी रॅकेटमध्ये निलेश पराडकर उर्फ आप्पासह दशरथ घाडीचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.
एप्रिल २०१९मध्ये सिंधुदुर्गात केली होती अटक : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा अत्यंत जवळचा समजला जाणारा निलेश पराडकर याला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस अधीक्षक (एसपी) च्या विशेष पथकाने ताब्यात घेतले होते. निलेशवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. निलेश मुंबईत राहत असून अनेक दिवसांपासून छोटा राजन कंपनीचा व्यवसाय अनधिकृतपणे हाताळत आहे.
निलेश अंडरवर्ल्डमध्ये शटल्या उर्फ आप्पा म्हणून ओळखला जातो. डीके राव याच्यानंतर निलेश उर्फ आप्पा हा राजनचा सर्वात जवळचा व्यक्ती आहे. जो छोटा राजन तुरुंगात असतानाही त्याची कंपनी चालवत आहे. निलेश जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये आल्याची माहिती सिंधुदुर्ग पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले होते.
नोव्हेंबर २०१५ मध्ये सुद्धा झाली होती अटक : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला इंडोनेशियात अटक केल्यानंतर राजनचा लेफ्टहॅन्ड म्हणवल्या जाणाऱ्या निलेश दिनकर पराडकर उर्फ शटल्याला मुंबई पोलिसांनी २०१५ मध्ये नोव्हेंबर महिन्यात अटक केली होती. यासोबतच राजन टोळीच्या तीन शूटर्सना उत्तर प्रदेशातील अलाहाबादमधूनही अटक करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, निलेश आणि त्याचा साथीदार रघु शेट्टी यांनी मुंबईतील एका विकासकाकडे 15 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याचे पोलीस अधिकारी आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले. शेट्टी आणि राजन हे दोघेही खंडणी प्रकरणात वॉन्टेड होते. उत्तर प्रदेश एसटीएफने छोटा राजन टोळीच्या तीन शूटर्सना अलाहाबादमधून अटक केली होती. हे तिघेही मुख्यत: छोटा राजनच्या आझाद अन्सारीशी संबंधित आहेत. आझाद अन्सारी सध्या अलाहाबादच्या नैनी मध्यवर्ती कारागृहात होता. मुंबईतील एका केबल व्यावसायिकाला ठार मारण्याचा कट हे तिघे शूटर रचत होते.
ठाणे खंडणी विरोधी पथकाची तेराजणांवर मोक्का कारवाई : कोपरी शिवसेनेचे उपविभागप्रमुख राजेश घाडगे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने १३ जणांना अटक केली होती असून यामध्ये जकात माफिया तसेच राजन टोळीचा समावेश आहे. दरम्यान, या सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर मोक्कातंर्गत कारवाई केली होती. विजय उर्फ कांच्या मोरे, सागर राजभर, रमेश साळवे, राहूल साळवे, नवनाथ गुरव, राजेश भालेराव, मोहसीन पटेल, शाम तांबे , श्रीपाद उर्फ निलेश पराडकर उर्फ शटल्या , मनिष साळवे (२९) तसेच जकात माफिया रोहित गायकवाड, बालमुर्गन मुदलीयार आणि मंदार भोसले या सर्वावर मोक्कांतर्गत कारवाई केली होती.