मुंबई - काँग्रेस कमिटीच्या बैठकीत पक्ष विरोधी भूमिकेबाबत जर माझ्याबाबत तक्रारी आल्या असतील तर, पक्षश्रेष्ठींना अधिकार आहे. त्यांनी जो काय निर्णय याबाबत घ्यायचा आहे तो घ्यावा, असे स्पष्टीकरण राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे. जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या बंगल्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली. त्यावेळी विखे पत्रकारांशी बोलत होते.
एकदा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ द्या, त्यानंतर मी याबाबत सविस्तर बोलेन. मी पक्षश्रेष्ठींना राजीनामा पाठवला आहे. तो स्वीकार झाला आहे, हे बातम्यात पाहिले. त्याबाबत माझा काही संवाद झाला नाही, असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षण या भेटीमागचा हा मुख्य मुद्दा होता. आज सकाळी 11 च्या दरम्यान अजित पवार यांनी महाजन यांची भेट घेतल्यानंतर काही वेळाने विखे पाटील गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करण्यासाठी शिवनेरी बंगल्यावर आले होते.
मराठा विद्यार्थी पदव्युत्तर पदवी वैद्यकीय आरक्षण प्रकरणी निर्माण झालेला तिढा आणि दुष्काळाबाबत गिरीश महाजन आणि विखे-पाटील यांच्यात चर्चा झाली
मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यावर लवकरात लवकर तोडगा निघावा, याबाबत चर्चा झाली. माझ्याकडेसुद्धा माझ्या कॉलेजचे काही विद्यार्थी आले होते. त्यांनीसुद्धा आपल्या मागण्या सांगितल्या आहेत, असे विखे पाटील म्हणाले.
याबाबत सरकारसुद्धा खूप प्रयत्न करत आहे. यासाठी आम्हीसुद्धा मदत करत आहोत, त्यामुळे तोडगा निघेल अशी आशा आहे. राज्यात दुष्काळ सुरू आहे. त्यात नगरमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. तो सुटावा यासाठी गोदावरी कालव्याच्या नुतनीकरणाचे काम व निळवंडे धरणाच्या पाण्याबाबत चर्चा झाली. जेणेकरून दक्षिण नगरला पाण्याची टंचाई भासू नये. पोलीस संरक्षणात पाणी आणावे लागते हे चुकीचे आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.