मुंबई: 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणे हे जरी एकमेकांच्या पसंतीचे असले तरीसुद्धा मागील काही वर्षांमध्ये या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मीरा रोड परिसरातील घटनेनंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहण्याचे अनेक फायदेसुद्धा आहेत.
फायदे:
1) 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहिल्यामुळे तुम्ही एकमेकांना जास्त समजून घेऊ शकता. एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवू शकता. एकमेकांच्या सवयी, आवडीनिवडी बाबत दोघांनाही माहिती होते.
2) 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये तुम्ही राहता तेव्हा भविष्यात येणाऱ्या अडचणी कशा पद्धतीच्या असू शकतात व त्याला कसे सामोरे जायचे याविषयी तुमचे एकमत होते. त्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढचे प्लॅनिंग करू शकता.
3) 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहिल्याने तुम्हाला एकमेकांचे अनुभव समजून घेता येतात. एकमेकांच्या स्वभावामध्ये काही वर-खालीपणा असेल तर त्यात तुम्हाला तडजोड करता येते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहिल्यानंतर आर्थिक बाबींवर तुम्हाला जास्त लक्ष केंद्रित करता येते.
तोटे:
1) अनेकदा 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहिल्यानंतर सुरुवातीला बरे वाटते; पण कालांतराने आर्थिक बाब किंवा संशयाच्या मुद्द्यावर दोघांमध्ये भांडण होऊन परिणाम टोकाला जातो. मुंबईत आणि देशभरात अशा पद्धतीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
2) 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये दोघेही कमावते असतील तर त्यांच्यामध्ये अधिकाराची भावना मोठ्या प्रमाणात निर्माण होते. त्यांच्यामध्ये अगोदर असलेले प्रेम आणि संवाद कमी होत जाऊन विसंवाद वाढत जातो. दोघेही कमावत असल्याने दोघांमध्ये अधिकाराची भावना मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. त्याच कारणाने त्यांच्यामध्ये भांडणे सुरू होऊन त्यांच्यातील वाद मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जातात.
जीवन जगण्याचा घटनात्मक हक्क : ज्येष्ठ वकील दिगंबर देसाई यांच्या म्हणण्यानुसार, 'लिव्ह इन' संकल्पनेसाठी भारतात कायदा नाही आहे. कलम-२१ अंतर्गत जीवन जगण्याचा घटनात्मक हक्क प्रत्येकाला आहे व त्यातूनच अशा पद्धतीच्या संबंधांना मान्यता दिली गेली आहे. दोन प्रौढ व्यक्ती अशा पद्धतीने 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये लग्न न करताही राहू शकतात. ते बेकायदेशीर मानले जात नाही. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा या दोन व्यक्तींपैकी एखादी व्यक्ती लग्न झालेली असेल तर या संबंधांमध्ये नक्कीच अडचणी निर्माण होतात; कारण कालांतराने लग्न झालेल्या व्यक्तीचा जोडीदार यावर अधिकार गाजवू शकतो. त्या कारणाने पुढे अनेक प्रश्न उद्भवू शकतात. मग ते आर्थिक मालमत्तेसंबंधात असतील किंवा काही हक्कापोटी असतील. प्रश्न उद्भवतात तेव्हा वाद विकोपाला जातात व अशा पद्धतीच्या घटना घडतात, असेही अॅडव्होकेट दिगंबर देसाई यांनी सांगितले आहे.
ठोस कोडीफिकेशन कायदा नाही : भारतीय संसदेने किंवा कोणत्याही राज्य विधिमंडळाने 'लिव्ह इन रिलेशनशिप'बाबत कोणताही ठोस कोडीफिकेशन कायदा केलेला नाही. तरीसुद्धा घरगुती हिंसाचार कायदा २००५ च्या कलम २(f) अंतर्गत 'लिव्ह इन'ची व्याख्या दिली गेली आहे. कारण घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत भारतीय कायदा 'लिव्ह इन'मध्ये एकत्र राहणाऱ्या लोकांना संरक्षण देतो. त्या संदर्भामध्ये न्यायालयाने काही नियम व अटी दिल्या आहेत.
नियम व अटी:
१) दोन्ही व्यक्तींच्या वास्तव्याचा कालावधी आवश्यक आहे.
२) दोघांनी पती-पत्नी प्रमाणे एका घरामध्ये एकाच छताखाली राहणे बंधनकारक आहे.
३) दोघांनी फक्त घरगुती वस्तूचा वापर करावा.
४) दोघांनी एकमेकांना घरातील कामात मदत करावी.
५) 'लिव्ह इन'मध्ये राहणारे जोडपे आपल्या मुलाला सोबत ठेवू शकतात.
६) 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या जोडप्याने त्यांची माहिती उघड करावी. त्यांच्यात गुप्त संबंध नसावेत.
७) 'लिव्ह इन'मध्ये राहणारे दोघेही प्रौढ असावेत.
८) 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या दोघांनी स्वतःहून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला असावा.
९) सर्वांत महत्त्वाची अट म्हणजे 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या दोघांसोबत त्यांचा कोणताही पूर्वीचा जोडीदार नसावा.
हेही वाचा: