मुंबई - गुजरातमधील वायू चक्रीवादळाला सामोरे जाण्यासाठी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने उपाययोजना आखल्या आहेत. वेरावळ, ओखा, पोरबंदर, भावनगर, भूज आणि गांधीधाम हे पश्चिम रेल्वेचे विभाग सज्ज झाले आहेत. १२ जून रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून १४ जूनपर्यंत सर्व पॅसेंजर आणि मेल एक्सप्रेस गाड्या शॉर्ट टर्मिनेट व रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी उपाययोजना तयार करण्यात आल्या आहे.
किनारपट्टीच्या परिसरातील डेपो आणि स्टेशन यार्डमध्ये उपलब्ध असलेले कोचिंग स्टॉक सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. सहा ते दहा कोच असलेल्या स्पेशल रेल्वे सज्ज करण्यात आल्या असून आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक त्या ठिकाणी पाठवण्यात येतील. प्रवाशांच्या सुल्भतेसाठी पश्चिम रेल्वे मुख्यालय व विभागाने राज्य सरकारच्या विभागांशी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आपत्कालीन नियंत्रण विभाग आणि रेल्वे प्रशासन यांच्यात तात्काळ सहकार्य करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. वादळात अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी पश्चिम रेल्वेने गांधीधाम, भावनगर, पारा पोरबंदर, वेरावल, ओखा येथून एक विशेष ट्रेन सज्ज ठेवली आहे.
संबंधित रेल्वे विभाग आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (डीएफसीसीआयएल) आणि रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) या सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. जेसीबी, वृक्ष कटर, वॉटर टँक, ट्रॅक्टरसारख्या आवश्यक यंत्रणेसह पुरेशी मनुष्यबळ, साहित्य पुरविणे आदी सूचना संबधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
आवश्यक असेल तेव्हा कोणत्याही मदतीसाठी सज्ज व्हा. आवश्यक ती कारवाई करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात राहण्याचे निर्देश देखील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.