मुंबई - रेल्वेच्या विविध विभागातील खासगीकरणाविरोधात शुक्रवारी वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाने मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येने पश्चिम रेल्वेचे कर्मचारी सहभागी झाले होते.
रेल्वे बोर्डाने एसी कोच कारखाना, खडगपूर, वाराणसी येथील डीजल लोकोमोटिव कारखाना, चेन्नईची इंटरगील रेल्वे कोच फॅक्टरी आदींबाबत खासगीकरणाचा आदेश काढला आहे. यात कोणत्याही रेल्वे युनियनला सहभागी न करता परस्पर हा निर्णय घेण्यात आला. तसेच रेल्वे काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे खासगीकरण करत आहे. नवी दिल्ली ते लखनऊ दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस ही आयआरसिटीसीला चालवण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे रेल्वे कर्मचारी देशोधडीला लागण्याची भीती कर्मचारी वर्गामध्ये आहे. याचविरोधात आज हा मोर्चा काढण्यात आला. तर याबाबत अनेकदा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना भेटून निवेदनही देण्यात आल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितले.