मुंबई - तरुण शहरी भारतीयांना स्थूलपणाशी लढा देण्यास साह्य करण्यासाठी मुंबईत ‘एनलायटन’ हे बेरिअॅट्रिक एण्डोस्कोपी केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथील प्रसिद्ध गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. अमित मायदेव आणि जगविख्यात बेरिअॅट्रिक सर्जन डॉ. मोहित भंडारी यांनी हे केंद्र सुरू केले आहे. यात स्थूलपणा आणि व्हिसेरल फॅटचा त्रास असणाऱ्यांसाठी या केंद्राची मदत होणार आहे.
या डॉक्टर जोडीने आतापर्यंत १५७ एण्डोस्कोपी स्लीव गॅस्ट्रोप्लास्टी (ईएसजी) प्रक्रिया केल्या आहेत. भारतात ही प्रक्रिया करणारे ते एकमेव डॉक्टर आहेत. त्यामुळे लोकांनी शस्त्रक्रिया करून वजन कमी न करता या उपचार पद्धतीचा वापर करून वजन कमी करता येते, असे या डॉक्टरांनी सांगितले.
आशियात सर्वाधिक बेरिअॅट्रिक सर्जरी करणारे डॉ. मोहित भंडारी म्हणाले, "मी २०१७ साली भारतात ही प्रक्रिया पहिल्यांदा आणली. आजवर ५२ महिला आणि ४१ पुरुषांवर मी ईएसजी प्रक्रिया केली आहे. १३ जून रोजी मी शंभराव्या रुग्णावर ही प्रक्रिया करणार आहे. २० ते ४० या वयोगटातील स्थूल व्यक्ती, विशेषत: ज्यांची बैठी जीवनशैली आहे, त्या ईएसजीचा पर्याय स्वीकारतात.
मी एक बेरिअॅट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जन आहे. आणि १२००० हून अधिक बेरिअॅट्रिक शस्त्रक्रिया केल्यानंतर एखादी शस्त्रक्रियाविरहित प्रक्रिया आणावी, असे मला वाटले. कारण, मी असे अनेक रुग्ण पाहिलेत ज्यांना १५ ते २० किलो वजन कमी करायचे आहे. मात्र, त्यांना शस्त्रक्रियेची भीती वाटते. कमी बीएमआय असूनही डायबेटिस आहे त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया होत नाही, असे रुग्ण आहेत. त्यामुळे मी या उपचार पद्धतीचा अभ्यास केला व शोध लावला, असे त्यांनी सांगितले.
काय आहे ही वजन कमी करण्याची उपचार पद्धत -
"ईएसजी ही नॉन-सर्जिकल प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत रुग्णाला एक दिवसाच्या हॉस्पिटलमधील वास्तव्यानंतर डिस्चार्ज देण्यात येतो. एण्डोस्कोप या कॅमेरा असलेल्या लवचिक नळीने आणि त्याला जोडलेल्या एण्डोस्कोपिक टाके घालण्याच्या उपकरणाने ही प्रक्रिया करण्यात येते. या सूक्ष्म कॅमेऱ्यामुळे डॉक्टर ही प्रक्रिया छेद न देता करू शकतात. पोटात घातलेले टाके पोटाची रचना बदलतात आणि शरीरात शोषल्या जाणाऱ्या कॅलरींवर मर्यादा आणतात. यानंतर सुरुवातील द्रव आहार सुरू करण्यात येतो. त्यानंतर निम-घन आहार आणि मग सामान्य सकस आहार करण्यास परवानगी देण्यात येते. काही आठवड्यांमध्ये रुग्ण सामान्यपणे आयुष्य जगू लागतो."