मुंबई : जवळपास जून महिना कोरडा गेल्यानंतर मान्सूनने मुंबईसह राज्यात दमदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी अधूनमधून पावसाच्या हलक्या तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळत आहेत.
चक्रीवादळामुळे लांबलेला मान्सून राज्यात धडकला आहे. कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने येत्या 48 तासांत राज्यासह देशभरात पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या 27 आणि 28 जूनला रोजदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अतिमुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भातही पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याचा अंदाज आहे. परंतु, मंगळवारी सकाळपासूनच पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे.
ठाण्यात वाहूतक कोंडी: सतत पडत असणारा पाऊस , अर्धवट राहिलेली रस्त्यांची कामे, मुलुंड टोल नाका यामुळे ठाण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ठाणे ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांब लांब रांगा लागलेला आहे. कामावरती जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाकडून कोणतेच प्रयत्न सुरू नाहीत. आंबेनळी दरीत कालिका पाँईटजवळ मंगळवारी रात्री दरड कोसळली आहे. दोन्ही दिशेकडील वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने वाहतूक विस्कळित झाली आहे. पोलादपूर महाबळेश्वर महामार्ग वाहतुकीसाठी बंद होणार आहे. ताम्हिणी घाटाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा, असा वाहतूक विभागाने सल्ला दिला आहे.
मुंबईत सोमवारी विश्रांती: रविवारी जोर'धार' कोसळल्यानंतर सोमवारी पावसाने विश्रांती घेतली. मुंबई, उपनगरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईच्या पूर्व उपनगरात रात्रीच्या सुमारास पावसाच्या सरीवर सरी कोसळल्या. जोर नसल्याने कुठेही पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या नाहीत. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात पावसाची नोंद झालेली नाही. तर सांताक्रूझ केंद्रात 27.0 मिमी पावसाची नोंद झाली. पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस: पूर्व महाराष्ट्रातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अर्जुनी मोरगाव तहसीलमधील नीमगाव-पिंपळेगाव रस्त्यावरील नाल्यात दुचाकीवरून जाणारा एक मध्यमवयीन व्यक्ती वाहून गेला आणि बुडाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. पावसामुळे पुजारीटोला धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. शेतकऱ्यांना पेरणी व भात रोपवाटिकेचे काम करण्यासाठी प्रतिक्षा पाहावी, असा सल्ला कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी दिला आहे.
हेही वाचा-