मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या ग्लोबल टेंडरवरून भाजपाचे माजी खासदार व नेते किरीट सोमैय्या यांनी सडकून टीका केली होती. त्यांनी ग्लोबल टेंडर या प्रक्रियेमध्ये दलालांचा हस्तक्षेप आहे आणि मुंबई महानगरपालिकेची सत्ताधारी शिवसेना ग्लोबल टेंडर काढून मुंबई महानगर पालिकेमध्ये अजून एक लसीकरणाचा मोठा घोटाळा करू पाहात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, या निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या 9 कंपन्यांपैकी एकही कंपनी पात्र न ठरल्याने अखेर हे टेंडर रद्द करण्यात आले आहे. यावर सोमैय्या यांनी प्रतिक्रिया दिली. आमच्या टीकेमुळेच मुंबईमधील एक मोठा घोटाळा सध्या पालिकेने बंद केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
फायझर आणि अस्ट्रॅझेनेका कंपनीची टेंडरमधून माघार -
फायझर अस्ट्रॅझेनेकाची लस पुरवणाऱ्या कंपनीनेही लसीकरण मोहिमेत भाग घेतला होता. नंतर या कंपनीने माघार घेतली. पण ही माघार घेण्याचे नेमके कारण काय, याचा कोणताही खुलासा कंपनीने केलेला नाही. तसेच कोणतेही कारण न देता फायझर आणि अस्ट्रॅझेनेका कंपनीने ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून माघार घेतल्याने मुंबई महापालिकेला मोठा धक्का बसला होता. कोरोनाची तिसरी लाट धडकण्याआधी प्रत्येक मुंबईकरांना ऑगस्ट अखेरपर्यंत लस मिळावी, असे पालिकेचे उद्दिष्ट आहे. पण नऊ कंपन्या बाद झाल्याने आता पालिकेच्या अडचणीत भर पडली आहे.
हेही वाचा - नागपुरात बंदूक घेऊन वैद्य कुटुंबाच्या घरात शिरला गुंड, ५० लाखांची मागितली खंडणी