मुंबई - राज्य सरकारकडून कोणत्याही आकडे लपवले जात नाही. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा राज्यसरकारने लपवलेला नाही, राज्य सरकार पारदर्शक आणि प्रामाणिकपणे काम करत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. कोरोनामुळे लोकांच्या झालेल्या मृत्यूच्या आकड्यात लपवालपव केल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो आहे. यातच 11 हजार मृत्यू राज्य सरकारच्या पोर्टलवर लपवण्याचा आल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण देत मृत्यूच्या आकड्यांमध्ये आरोग्य विभागाकडून लपवाछपवी केली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
'वेळेत माहिती अपडेट झाली नाही, तर कारवाई केली जाईल' -
प्रत्येक जिल्ह्यात खासगी आणि सरकारी असे दोन दवाखाने आहेत. यामध्ये सरकारी रुग्णालयातील मृत्यूची आकडेवारी अपडेट होत असते. मात्र, बऱ्याचदा खासगी रुग्णालयात मृत्यूचे आकडे अपडेट होत नाहीत. त्यामुळे आकड्यात तफावत राहत असल्याचे आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच सर्व खासगी रुग्णालयाच्या मुख्य शल्यचिकित्सकांना आरोग्य विभागाकडून पोर्टल अपडेट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वेळेत माहिती अपडेट झाली नाही, तर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच पोर्टलवर माहिती आणि मृत्यूची संख्या अद्यावत करण्याचे काम डेटाइन्ट्री ऑपरेटर करत असतात. दुर्देवाने कधी कधी वेळवर डेटा अपलोड केला जात नाही, असेही यावेळी आरोग्यमंत्र्यांनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा - आज पहिले सूर्यग्रहण, जाणून घ्या तुमच्या राशींवर कसा होईल परिणाम