मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयाची तांत्रिक कामे सध्या हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी उद्या म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते दिनांक 25 ऑगस्ट सकाळी दहा वाजेपर्यंत चेंबूर, गोवंडी, शिवाजीनगर व मानखुर्द या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी पाणी जपून वापरावे असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.
दुरुस्तीचे काम पूर्ण, पाणी भरण्याचे काम सुरू- याबाबत पालिकेने दिलेली माहिती अशी की, ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक एक आणि दोनची दुरुस्तीची काम आता पूर्ण झाली आहेत. त्यानंतर कप्पा क्रमांक एकमध्ये इनलेटद्वारे एक हजार आठशे मिलिमीटर पाणी भरण्याचे काम 24 ते 25 ऑगस्ट रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गोवंडी, चेंबूर, शिवाजीनगर, मानखुर्द या भागात राहणाऱ्या रहिवाशांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि काटकसरीने पाणी वापरावे, असे पालिकेने म्हटलं आहे.
या एम पश्चिम भागातील पाणी पुरवठा होणार खंडित- या पाणी कपातीचा परिणाम पालिकेच्या एम पूर्व विभागातील रफिक नगर बाबा नगर, संजय नगर, आदर्श नगर, निरंकार नगर, एकता नगर, म्हाडा इमारती, शिवाजीनगर, बैंगनवाडी रोड, कमला रमण, रमण मामा नगर, अहिल्यादेवी होळकर मार्ग, गौतम नगर, लोटस वसाहत, नटवर पारेख कंपाउंड, शंकरा वसाहत, इंडियन ऑइल नगर विभाग, टाटा नगर, गोवंडी स्थानक रोड, देवनार पालिका कॉलनी या भागात पाणी पुरवठा खंडित राहणार आहे.
- एम पूर्व विभागातील या भागात पाणी पुरवठा राहणार बंद- देवनार फार्म रोड, देवनार गाव रस्ता, गोवंडी गाव यासह इतर अनेक ठिकाणी पाणी येणार नाही. तर एम पश्चिम प्रभागात प.ल. लोखंडे मार्ग, शांता जोग मार्ग, पी.वाय. थोरात मार्ग, छेडा नगर, श्रीनगर सोसायटी, मुकुंदनगर, एस.ओ. टी.रोड, हेमू कलानी मार्गासह अनेक ठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही.
9 ऑगस्टपासून 10 टक्के पाणी कपात रद्द- मुंबईत 39 दिवसांनंतर 9 ऑगस्टपासून 10 टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली. याबाबतची घोषणा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी केली. जुलैमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर 2023 मध्येही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.