मुंबई : ठाणे येथील कोपरी पुलाजवळ ठाणे महानगरपलिकेतर्फे नवीन पुलाचे काम सुरु होते. त्यावेळी बृहन्मुंबई महापालिकेच्या २,३४५ मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई २’ जलवाहिनीस हानी पोहोचून पाणी गळती झाली. या गळती दुरुस्तीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे गुरुवार, दिनांक ९ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासूव शनिवार, दिनांक ११ मार्च २०२३ रोजी सकाळी १० पर्यंतच्या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे.
१० टक्के पाणी कपात : जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याने गुरुवार, दिनांक ९ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून शनिवार, दिनांक ११ मार्च २०२३ रोजी सकाळी १० पर्यंत पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील काही परिसरात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. नमूद कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
पाणी कपात होणारे विभाग : पूर्व उपनगरात पाणीकपात होणार आहे. टी विभागातील मुलूंड (पूर्व) व (पश्चिम) विभाग, एस विभागातील भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी येथील पूर्व विभागाचाही समावेश आहे. एन विभागातील विक्रोळी (पूर्व), घाटकोपर (पूर्व) आणि (पश्चिम), एल विभागातील कुर्ला (पूर्व) विभाग, एम/पूर्व विभागातील संपूर्ण विभाग, एम/पश्चिम विभागातील संपूर्ण विभागाचा यात समावेश आहे. त्याशिवाय शहर विभागांच्या ए विभागातील बीपीटी व नौदल परिसर, बी विभागातील संपूर्ण परिसर, ई विभागातील संपूर्ण परिसर, एफ/दक्षिण विभागातील संपूर्ण परिसर, एफ/उत्तर विभागातील संपूर्ण परिसर
कुर्ल्यात १० शनिवार पाणी बंद : महापालिकेच्या कुर्ला एल विभागात खैरानी रोड येथील तुकाराम पूल ते जंगलेश्वर महादेव मंदीर येथील जलवाहिनीच्या सक्षमीकरण आणि मजबुतीकरणाचे काम केले जाणार आहे. या कामाला १० दिवस लागणार आहे. हे काम सलग केल्याने नागरिकांची गैरसोय होणार होती. त्यासाठी पालिकेने टप्प्याटप्प्याने दर शुक्रवार आणि शनिवारी हे काम करण्याचे नियोजन केले आहे. ४ मार्च ते ६ मे या कालावधीत दर शुक्रवार आणि शनिवारी हे काम केले जाणार आहे. यामुळे या विभागात सलग १० शनिवार पाणी पुरवठा बंद राहणार आहे.