मुंबई - महालक्ष्मी येथील रेस कोर्स गेट नंबर ४ येथे आज(गुरुवार) सकाळी पाणीपुरवठा पाईपलाईन फुटली. यामुळे मुंबई सेंट्रल परिसरातील नागरिकांचे पाणी नसल्याने हाल झाले. तर, याचा फटका या परिसरातील नायर आणि कस्तुरबा रुग्णालयालाही बसल्याचे समजते.
मुंबई सेंट्रल विभागाला पाणी पुरवठा करणारी १४५० मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन आज पहाटे महालक्ष्मी येथील रेसकोर्सच्या गेटजवळ गेट नंबर ४ फुटली. पाईपलाईन फुटल्याने रेसकोर्सच्या गेटजवळ पाण्याचे कारंजे उडत होते. यामुळे वाया जाणारे पाणी बाजूच्या रस्त्यावर आल्याने येथे काही प्रमाणात पाणी साचले होते. पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळताच पालिकेचे कर्मचारी रेसकोर्स येथे हजर झाले असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
हेही वाचा - विक्रोळीत शिवसेना पदाधिकारी शेखर जाधव यांच्यावर गोळीबार
पाईपलाईन फुटल्याने मुंबई सेंट्रल विभागाला पाणी पुरवठा योग्य प्रकारे झाला नसल्याने नागरिकांचे हाल झाले. तर, याच विभागात असलेल्या नायर आणि कस्तुरबा रुग्णालयात पाणी आले नसल्याने त्याठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आल्याचे समजते. दरम्यान रेसकोर्सच्या गेट नंबर ४ जवळ पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - मुंबई महापालिकेची थकीत करवसुलीसाठी बिल्डरांवर मेहरबानी, बांधकाम करात सवलत