मुंबई - कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा वाढत असताना रुग्ण बरे होऊन घरी येण्याचे प्रमाणदेखील दिवसेंदिवस वाढत आहे. पवईच्या पंचशील नगर येथील क्वारंटाईन करण्यात आलेले एक वृद्ध दाम्पत्य आज (गुरूवारी) योग्य तपासण्या करून घरी आले. त्यावेळी चाळीतील लोकांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.
मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या ही राज्यातील रुग्णाच्या 60 टक्के आहे. अनेक विभागात रोज नव्या रुग्णाची भर पडत आहे. उपनगरातील पवई येथे काही दिवसांपासून बाधित रुग्ण आढळून येत होते. पालिकेने याठिकाणी योग्य प्रकारे उपाययोजना आणि परिसर सील केला आहे. बाधित रुग्ण संख्या वाढणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. कोरोना रुग्ण बरे होऊन घरी येतेवेळी काही ठिकाणी सोसायटीच्या आत घेतले जात नाही. तर काही ठिकाणी त्यांचे स्वागत केले जात आहे.
हेही वाचा - कोरोनाचा फटका : नांदेडमध्ये अडकलेल्या उत्तराखंडच्या जगदगुरूंना 'या' मंत्र्यांमुळे मिळाली प्रवासाची परवानगी
पवईतील पंचशिल निवास सोसायटीमधील वृद्ध दाम्पत्य यांना कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील म्हणून एका क्वारंटाईन केंद्रात 14 दिवस भरती केले होते. तपासणी करून त्यांच्यात कोणतेही लक्षण आढळून आले नसल्याने त्यांना बुधवारी त्यांच्या घरी सोडले. दुपारी 4 वाजेच्या सुमारास क्वारंटाईन कक्षातून बाहेर निघत मोकळा श्वास घेत सोसायटीच्या आवारात प्रवेश करताच सर्व रहिवाशांनी टाळ्या वाजवून ओवाळणी केली. त्यांचे पुन्हा नव्याने चाळीत स्वागत करून केले. दोघेही सोसायटीच्या आवारात येताच टाळ्यांच्या गडगडाट ऐकून दाम्पत्याचे अश्रू अनावर झाले. रहिवाशांनी वृद्ध दाम्पत्याला शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांना धीर देत नव्याने स्वागत केले.