मुंबई - मुंबईत रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या चेंबूर येथील वाशी नाका येथील इंदिरा नहार परिसरातील एक भिंत कोसळून पाच रिक्षांचे नुकसान झाले असून चार शेळ्या ठार झाल्या आहे. ही घटना पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान झाली आहे .
शुक्रवार सकाळपासूनच मुंबईला पावसाने चांगलेच झोडपले. यात मुंबईत जागोजागी सखल भागात पाणी भरले तर विक्रोळी व कांजूरमार्ग येथे रेल्वे रूळावर पाणी भरल्याने काही वेळ रेल्वे सेवा धीम्या गतीने चालू होती. चेंबूरमध्ये पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भिंत कोसळली. चेंबूरच्या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी त्या भिंती शेजारी उभ्या असलेल्या ५ रिक्षा दबले गेले. तर रहिवाशांच्या पाळीव ४ शेळ्या यात दबून मृत्युमुखी पडल्या.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केले. वारंवार या विभागांमध्ये भिंत कोसळण्याच्या घटना घडत असतात. यावर प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे, यापूर्वी अशा घटनांमुळे जीवित हानी देखील झाली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरीक करत आहेत.